गुवाहटी - आसाममधील तिनसुखिया जिल्ह्यातील बाघजान येथील एका तेल विहिरीला 9 जूनला आग लागली होती. तेव्हापासून आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, आग अद्याप विझलेली नाही. आगीचे लोळ उंच हवेत पसरले आहेत. तब्बल 30 किमी लांबीवरूनही ही आग दिसत आहे. या आगीने परिसरात पर्यावरणाचे नुकसान होत असून धुराचा थर जमा होत आहे.
आगीवर नियंत्रण आणून पर्यावरणाला हाणी पोहोचणार नाही यासाठी केंद्र सरकारने विविध उपाय योजना करण्यास सुरुवात केली आहे. तेल विहरीचा हा परिसर जैवविविधतेने संपन्न असून येथून जवळच दिब्रु शिखावा नॅशनल पार्क आणि मागुरु मोटापुंग बील दलदलीचा प्रदेश आहे. या परिसरातील हवेची स्थिती आणि पर्यावरणातील बदल सतत तपासण्यात येत आहेत.
तेल विहिरीला लागलेल्या आगीमुळे दोन कर्मचाऱ्यांचाही मृत्यू झाला आहे. तर परिसरातील मालमत्ता, शेती आणि पर्यावरणाचे नुकसात होत आहे. या परिसरात राहणारे 7 हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. आग विझविण्यासाठी लष्कराच्या कॉर्प्स 3 कडून येथे आणिबाणीच्या परिस्थितीत पूलही बांधण्यात येत आहे. या पूलामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना तेल विहिरीच्या जवळ जाता येणार आहे.
तेल विहिरीतील आग विझविण्यासाठी हिट शिल्ड(अग्निविरोधी उपकरणे) तयार करण्यात येत आहेत. ऑईल इंजिनिअरिंग वर्कशॉपमध्ये हे काम सुरू आहे. आगीमुळे किती नुकसान झाले असून नुकसान भरपाईसाठी स्थानिक प्रशासनाने सर्व्हे करण्यास सुरुवात केली आहे. एनर्जी रिसोर्स इंन्स्टिट्युटकडून परिसरातील आवाजाची आणि प्रदुषणाची तीव्रता मोजण्यात येत आहे.