चंदीगढ - देशभरात लॉकडाऊन असल्याने अत्यावश्यक सेवेची वाहने सोडून इतर वाहनांना परवानगी नाही. मात्र, पंजाबमध्ये पैसे घेवून वाहने सोडणाऱ्या एका सहाय्यक पोलीस अधिकाऱ्यासह दोन होमगार्डच्या जवानांना निलंबित करण्यात आले आहे. पंजाब-हिमालचप्रदेश सीमेवर ही घटना घडली.
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अश्विनी कुमार आणि होमगार्ड विभागाचे जवान बलवंत सिंग आणि बलदेव सिंग यांना निलंबित करण्यात आले आहे. सरदार पोलीस ठाण्याचे प्रमुख तलविंदर सिंग यांनी कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस अधिक्षकांकडे दिला होता. पैसे घेतानाची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाली आहे.
प्रत्येक वाहन चालकाकडून १०० रुपयांची वसूली
पंजाब- हिमालच प्रदेश सिमेवर असणाऱ्या होशियारपूर- उना रस्त्यावरील चक साधू गावातील तपास नाक्यावर त्यांची नेमणूक करण्यात आली होती. तेथून येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहन चालकांकडून ते प्रत्येकी १०० रुपये वसूल करत होते.पैसे घेण्याचे प्रकरण पुढे आल्यानंतर होशियारपूरचे वरिष्ठ पोलीस अधिक्षक गौरव गर्ग यांनी तिघांना निलंबित केले. या घटनेची चौकशी करण्यासाठी पथक नेमण्यात आले आहे.