नवी दिल्ली - माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नव्या मंत्रिमंडळात आपल्याला कोणतीही जबाबदारी देण्यात येऊ नये, अशी मागणी नरेंद्र मोदींकडे केली आहे. याविषयी त्यांनी मोदींना पत्र लिहून कळवले आहे. अरुण जेटली मागच्या काही काळापासून आजारी आहेत. त्यामुळे ते नव्या मंत्रिमंडळात असणार की, नाही याबद्दल उलट सुलट चर्चा सुरु होत्या. अखेर जेटलींनी स्वतःहूनच माघार घेत चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
सलग दुसऱ्यांदा केंद्रात बहुमत मिळवणाऱ्या नरेंद्र मोदी सरकारचा उद्या ३० मे रोजी शपथविधी होणार आहे. त्याआधी अरुण जेटलींनी नरेंद्र मोदींना पत्र लिहून सध्या जबाबदारी न देण्याविषयी विनंती केली आहे. 'मागच्या पाच वर्षांपासून तुमच्या नेतृत्वाखालील सरकारचा भाग असणे ही माझ्यासाठी सन्मानाची बाब होती. मला भरपूर काही शिकायला मिळाले. एनडीएच्या पहिल्या सरकारमध्येही पक्षाने माझ्यावर जबाबदारी सोपवली होती. मागच्या दीड वर्षात मला प्रकृती संदर्भातील वेगवेगळया गंभीर समस्यांचा सामना करावा लागला. डॉक्टरांच्या मदतीने मी त्यातून बाहेर पडू शकलो. भविष्यात काही काळासाठी मला जबाबदारीपासून दूर ठेवावे,' असे जेटलींनी या पत्रात म्हटले आहे.
२३ मे रोजी लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने सलग दुसऱ्यांदा केंद्रात पूर्ण बहुमत मिळवले. उद्या ३० मे रोजी मोदी सरकारचा शपथविधी होणार आहे. भाजपने या निवडणुकीदरम्यान वृद्धत्वाकडे झुकलेल्या तसेच, प्रकृती नाजूक बनलेल्या नेत्यांना उमेदवारी नाकारली होती. भाजपने पक्षांतर्गत ही बाब स्पष्ट केल्यानंतर सुषमा स्वराज, सुमित्रा महाजन यांनी निवडणुकीआधीच माघार घेतली होती. आता जेटलींनीही स्वतःहून माघार घेतली आहे.