नालबारी (आसाम) - ब्रम्हपुत्रा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने आसाम राज्याच्या बहुतांश भागात पूर स्थिती निर्माण झाली आहे. पुरामुळे जीवितहानी बरोबरच लोकांच्या संपत्तीचेही नुकसान झाले. मात्र, अशा कठीण परिस्थितीत भारतीय सैन्य लोकांच्या मदतीला उतरले आहे.
सैन्याच्या रेड हॉर्न्स डिव्हीजनच्या तुकडीने पशु वैद्यकीय रुग्नालयाच्या प्रतिनिधींबरोबर व जिल्हा पशु वैद्यकीय आणि आरोग्य सेवा यांच्या मदतीने, नालबारी जिल्ह्यातील पूरग्रस्त हेल्चा गावात रविवारी आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. राज्यात पुरामुळे सर्वत्र पाणी पाणी झाल्याने संक्रमक रोगांची लागन होण्याची शक्यता असते. यात परजीवी जिवाणुंच्या संक्रमणामुळे लोकांना व त्यांच्या पशुधनाला झुनोसिस या आजाराची लागन होण्याची शक्यता असते. याच पार्श्वभूमीवर सेनेने या आरोग्य शिबीराचे आयोजन केले होते.
यावेळी हेल्चा बरोबरच शेजारील गावांना सुद्धा सैन्याने आरोग्य सुविधा पुरविली. परिसरातील बहुतांश भागात पुराचे पाणी साचल्याने येथे वाहतूक करणे कठीण झाले आहे. त्यामुळे अशा भागात सेनेने पायदळ तुकडीच्या माध्यमातून आरोग्य सेवा पुरविली. आतापर्यंत या आरोग्य शिबिरामुळे ७५७ गावकऱ्यांना लाभ झाला आहे. यात ३०२ महिला, १५१ मुले, ७५ ज्येष्ठ नागरिक व ४५४ पशुधनाचा समावेश आहे. त्याचबरोबर सैन्याने या क्षेत्रातील माजी जवानांच्या तक्रार निवारणासाठी ई.एस.एम सेलची स्थापना केली आहे. याद्वारे सैन्याला या भागातील तरुण मुलांना सैन्यात भरती होण्यासाठी प्रोत्साहित करण्याची संधी मिळाली आहे. दरम्यान, राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने राज्यात संततधार पावसामुळे ५० नागरिक दगावले असल्याचे सांगितले.
...या ठिकाणी ब्रम्हपुत्रा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे
जोरहाट येथील निमातीघाट, गुवाहाटी (कामरूप), गोलपारा, धुबरी, गोलाघाटच्या नुमालीगढ येथील धानसिरी, सोनितपूर येथील जिया भराली, आणि नागावच्या धर्मतूल येथील कोपिली या ठिकाणी ब्रम्हपुत्रा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.