पुणे - देशाच्या सुरक्षिततेला प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष असे धोके आहेत. हे धोके लक्षात घेऊन आपल्या सैन्याने सज्ज राहावे, असे प्रतिपादन भारतीय हवाई दलाचे प्रमुख आर के एस भदौरीया यांनी केले. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने निर्णय घेण्यासाठी उच्च पातळीवरील ज्ञान, समर्पण, वचनबद्धता आणि त्याग तसेच सर्व स्तरांवर नेतृत्व आवश्यक असल्याचेही भदौरीया यांनी सांगितले. ते राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 139व्या तुकडीच्या दीक्षांत संचलन सोहळ्यात बोलत होते.
देशाच्या रक्षणासाठी सैन्यात भरती होणाऱ्या नवीन परीक्षणार्थिंना उद्देशून भदौरीया म्हणाले की, तुमच्याकडे उत्तम ज्ञान, समर्पण, वचनबद्धता आणि नेतृत्व करण्याची क्षमता असणे आवश्यक आहे. हेच तुमच्याकडून अपेक्षित आहे. सैन्यात तुम्ही नवीन असल्याने देशातील भौगोलिक परिस्थिती समजून घेणे गरजेचे आहे. जगभरातील राजकीय वातावरणाचा आपल्या देशाच्या सुरक्षेवर आणि वातावरणावर परिणाम होतो, याबद्दल तुम्ही जागरुक असणे अपेक्षित आहे, असेही भदौरीया म्हणाले.
एनडीए ही जगातील सर्वोत्कृष्ट अकॅडमी -
एनडीए ही जगातील सर्वोत्कृष्ट अकॅडमीपैकी एक आहे. युद्धभूमीवर योग्य प्रतिसाद आणि कामांमध्ये एकात्मिक समन्वयात्मक दृष्टीकोन साधणे गरजेचे असते, असेही भदौरीया म्हणाले.
चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ यांची नेमणूक आणि डीएमएची स्थापना ही आपल्या देशात उच्च संरक्षण सुधारणांच्या ऐतिहासिक टप्प्याची सुरुवात आहे. तुम्ही एनडीए नावाच्या उत्तम अकॅडमीत प्रशिक्षण घेतले असून यापुढे देशासाठी सेवा देत असताना आपण आपली भूमिका योग्यरीत्या पार पाडाल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात एनडीएच्या 139 व्या तुकडीचा दीक्षांत संचालन कार्यक्रम एनडीएच्या मैदानावर पार पडला. या संचलनात 217 कॅडेट्सने सहभाग घेतला होता. एनडीएचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या या 217 कॅडेट्समध्ये 49 कॅडेट विज्ञान शाखा, 113 कॅडेट्स कॉम्प्युटर सायन्स तर 55 कॅडेट्स कला शाखेतून उत्तीर्ण झाले आहेत. तर यंदाच्या तुकडीत 12 कॅडेट्स हे मित्र राष्ट्रातील होते.