नवी दिल्ली - ओडिशामध्ये अम्फानच्या वादळामुळे धोकादायक वारे वाहू लागले आहेत. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ओडिशामध्ये आतापर्यंत 1704 निवारा छावण्या सुरू करण्यात आल्या असून 1 लाख 19 हजार 75 लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. तसेच ओडिशामध्ये भूसख्खलन होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
आज पहाटे साडेसहा वाजल्यापासून अम्फान हे पश्चिम बंगालच्या उपसागरामध्ये घोंगावू लागले आहे. पारादीप पासून दक्षिण-पूर्वमध्ये फक्त 125 किलोमीटर अंतरावर आहे. ओडिशात 82 ताशी किमी वेगाने जोरदार वारे वाहत आहेत. पारादीप येथे १०२ किमी, चांदबलीमध्ये 74 किमी, भुवनेश्वरमध्ये 37 किमी, बालासोरमध्ये 61 किमी आणि पुरी येथे 41 किमी ताशी वेगाने वारे वाहत आहेत. ओडिशातील भद्रक येथेही पाऊस आणि जोरदार वारे वाहू लागले आहेत.
अम्फान वादळाचा सामना करण्यासाठी ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ) चे 19 पथके तैनात करण्यात आले आहेत. दक्षिण-24 परगणामध्ये 6 टीम, पूर्व मिदनापूर व कोलकाता येथे 4 टीम, उत्तर -24 परगणामध्ये 3 टीम, हूगळी व हावडा येथे 1 टीम तैनात करण्यात आली आहे. नागरिकांना सतर्क राहण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत.