श्रीनगर - जम्मू आणि काश्मीरमधील नेते सईद अल्ताफ बुखारी यांनी नव्या पक्षाची स्थापना केली आहे. 'अपनी पार्टी' असे नव्या पक्षाचे नाव ठेवले आहे. आम्ही पूर्ण सन्मानाने काश्मीरी पंडिताना जम्मू काश्मीरमध्ये आणू, तसेच महिला आणि तरुणांचे सक्षमीकरण करू, असे त्यांनी म्हटले आहे.
स्वप्न आणि कल्पना विकण्यासाठी आम्ही येथे आलो नाही. व्यावहारिक आणि प्रामाणिक काम करण्याचा आमचा दृष्टीकोन असणार आहे. पक्षाचा मुळ हेतू हा जम्मू काश्मीरमधील जनतेच्या स्वाभिमान आणि आत्मसन्मानाची जपवणूक करणे हा असणार आहे, असे बुखारी म्हणाले.
पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी (पीडीपी) या राजकीय पक्षाचे ते माजी मंत्री होते. मुफ्ती सरकारमध्ये त्यांनी कृषी मंत्र्याची जबाबदारी पार पाडली होती. हा पक्ष खोऱ्यातील सामान्य लोकांचा पक्ष आहे. त्यामुळे पक्षाचे नाव अपनी पार्टी असे ठेवले असल्याचे बुखारी यांनी सांगितले. अपनी पार्टीमध्ये डेमोक्रेटिक पार्टी नॅशनलिस्ट पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मंत्री गुलाम हसन मिर यांच्यासह इतर नेत्यांनी प्रवेश केला आहे.