रोम - एअर इंडिया आज (शनिवार) इटलीमध्ये अडकेलेल्या भारतीयांची दुसरी बॅच एअरलिफ्ट करणार आहे. इटलीमध्ये कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे ४ हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर ४७ हजार नागरिकांना बाधा झाली आहे. त्यामुळे इटलीत अडकलेल्या भारतीयांना माघारी आणण्यात येणार आहे. ७८७ ड्रिमलायनर या विमानाने भारतीयांना मायदेशी आणण्यात येणार आहे.
आज दुपारी अडीच वाजता एअर इंडियाचे विमान रोमला रवाना होणार असून रविवारी माघारी येणार आहे. सर्व प्रवाशांची वैद्यकीय चाचणी घेण्यात येणार असून त्यांना क्वारंटाईन करण्यात येणार आहे. पहिल्या बॅचमध्ये २१८ भारतीयांना माघारी आणण्यात आले. युरोपात सर्वात जास्त कोरोनाचा प्रसार इटलीमध्ये झाला आहे. काल शुक्रवारी दिवसभरात ६०० पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
आरोग्य यंत्रणांवर आधीच ताण असल्याने इटलीत अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुरक्षित माघारी आणण्यात येणार आहे. मात्र, सर्व प्रवाशांची चाचणी घेण्यात येणार आहे. इटलीतील मृतांचा आकडा चीनपेक्षा जास्त झाला आहे.