नवी दिल्ली : देशातील पहिली प्लाझ्मा बँक दिल्लीमध्ये सुरू करण्यात आली आहे. कोरोनाशी लढा देण्यासाठी प्लाझ्मा थेरपी हा पर्याय बऱ्याच अंशी उपयोगी ठरत असल्यामुळे, लोकांनी मोठ्या प्रमाणात प्लाझ्मा दान करावा असे आवाहन मुख्यमंत्री केजरीवाल यांनी केले होते. त्यानंतर आता 'आप' आमदार अतिशी आणि दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी प्लाझ्मा दान करण्याचा निर्णय घेतला आहे.
प्लाझ्मा दान करण्याइतपत माझी प्रकृती ठीक नाही. मात्र, जेव्हा मला परवानगी मिळेल तेव्हा मी प्लाझ्मा दान करणार आहे अशी माहिती 'आप' आमदार अतिशी यांनी ट्विट करत दिली आहे. तर, आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन म्हणाले, की प्लाझ्मा थेरपीमुळेच माझ्यावरील उपचार यशस्वी झाले आहेत. त्यामुळे वैद्यकीयदृष्ट्या जेव्हा मी सक्षम होईल तेव्हा सर्वप्रथम मी प्लाझ्मा दान करणार आहे.
काय असते प्लाझ्मा थेरपी..?
यामध्ये कोरोनाची लागण झालेला रुग्ण बरा झाल्यानंतर त्याच्या दोन चाचण्या घेतल्या जातात. त्याच्या दोनही चाचण्या निगेटिव्ह आल्यानंतर चौदा दिवसांनी पुन्हा एकदा त्याच्या रक्ताची तपासणी केली जाते. यावेळी त्याच्या रक्तामध्ये अँटीबॉडीजचे घटक (घातक विषाणूंना नष्ट करणारा रक्तातील घटक) शिल्लक आहेत का हे तपासले जाते.
जर या व्यक्तीच्या रक्तांमधील अँटीबॉडी या एका ठरावीक पातळीहून अधिक असतील, आणि या व्यक्तीचे वजन ५५ किलोंहून अधिक असेल, तर त्याच्या रक्तामधील ८०० मिलीलीटर प्लाझ्मा काढला जातो. हा प्लाझ्मा नंतर चार भागांमध्ये विभागला जातो. यामधील २०० मिलीलीटर प्लाझ्मा हा गंभीर रुग्णांवरती उपचार करण्यासाठी वापरला जातो. हा प्लाझ्मा कित्येक आठवड्यांपर्यंत साठवून ठेवता येतो.
मुख्यमंत्री केजरीवाल यांनी याबाबत माहिती देताना सांगितले, की यशस्वी उपचारांनंतर १४ दिवस पूर्ण झाल्यानंतर एखादी व्यक्ती प्लाझ्मा दान करण्यासाठी पात्र ठरते. तसेच, १८ ते ६० वयोगटातील, ५० किलोपेक्षा जास्त वजन असलेल्या व्यक्तीच यासाठी पात्र ठरतात असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा : #Covid-19: प्लाझ्मा थेरपी आणि कोरोनावरील उपचारांसंबंधी...