नवी दिल्ली - 'अम्फान' चक्रीवादळाचे रुपांतर 'सुपर सायक्लोन'मध्ये झालं असून आज हे चक्रीवादळ ओडिशाच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे. या वादळाचा तडाखा पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या किनारपट्टीच्या भागांना बसणार आहे. चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालच्या किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
सायक्लोन(वादळ) म्हणजे काय?
कमी हवेचा दाब असलेल्या पट्ट्याकडे जास्त दाब असलेल्या प्रदेशाकडून वेगाने वारे वाहिल्याने वादळ तयार होते. विषुवृत्ताच्या उत्तरेकडे कमी दाबाच्या पट्ट्याकडे वारे आकर्षित होतात. हे वारे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरतात. त्यामुळे तेथे वादळ निर्माण होते. याचप्रमाणे विषुवृत्ताच्या दक्षिणेकडे ही वादळे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने गोलाकार फिरतात.
विषुववृत्तीय प्रदेश सोडता पृथ्वीच्या सर्वच भागात वादळं तयार होतात. काहींची तीव्रता जास्त असते तर काही सौम्य स्वरूपाची असून नष्ट होतात. काही वादळे 200 ते 300 किमी प्रतितास या वेगानेही वाहतात. हे वादळ समुद्र किनाऱ्यावर वेगाने धडकल्याने विध्वंस होतो. बंगालच्या उपसागरात तयार झालेले अम्फान वादळ 20 तारखेला भारताच्या पूर्व किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे ओडिशाचा किनारी भाग आणि आजूबाजूच्या किनारी प्रदेशात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
'अम्फान' हे नाव का?
चक्रीवादळाला 'अम्फान' हे नाव थायलंड या देशाने दिले आहे. 2004 मध्ये 64 देशांनी दिलेल्या नावांच्या यादीतील हे शेवटचे नाव असून यावर्षीच्या पहिल्या चक्रीवादळाला देण्यात आले आहे. दरम्यान समुद्रावर निर्माण होऊन जमिनीकडे धावणाऱ्या चक्री वादळांना हिंदी महासागरात सायक्लोन, वायव्य पॅसिफिकमध्ये टायफून आणि ईशान्य पॅसिफिक आणि अटलांटिक महासागरांत हरिकेन म्हणतात. ऑस्ट्रेलियातील धुळीच्या वादळाला विली-विली म्हणतात.
संयुक्त राष्ट्रसंघाची जागतिक हवामान संघटना हे जगभरातल्या वादळांच्या नावाची यादी बनवते. 2000 च्या दशकात बंगालचा उपसागर आणि अरबी समु्द्रामध्ये येणाऱ्या आठ देशांनी चक्रीवादळाला नाव देण्याची शिफारस जागतिक हवामान संघटनेला केले होते. लोकांच्या धार्मिक भावना दुखावणार नाही, अशी आशयाची नावे वादळाला देण्याचा प्रयत्न केला जातो.
ओडिशा किनारपट्टी व लगतच्या जिल्ह्यांना (गजपती, गंजम, नयागढ, पुरी, खोर्डा, कटक, जगतसिंहपूर, केंद्रापाडा, जाजपूर, भद्रक, बालासोर आणि मयूरभंज) यांना सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
भारतीय हवामान खात्याने पश्चिम बंगाल, ओडिशा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, अंदमान निकोबार, आसाम आणि मेघालय या राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.