नवी दिल्ली - कोरोना विषाणू कामगारांवर उपासमारीची वेळ आल्याने त्यांनी आपल्या गावाचा रस्ता धरला आहे. मात्र काही कामगारांना घरी जाण्यासाठीही पैसे नसल्याने त्यांचे हाल होत आहेत. अशाच उपासमार होणाऱ्या 3 कामगारांसाठी 12 वर्षाची बालिका देवदूत होऊन आली आहे. या बालिकेने आपल्याकडील जमा केलेले 48 हजार रुपयातून 3 कामगारांना चक्क विमानातून त्यांच्या घरी पाठवले आहे. निहारीका द्विवेदी असे या बालिकेचे नाव आहे.
नोएडा येथील निहारीकाने आपल्या जमा केलेल्या रकमेतून या 3 कामगारांचे चक्क झारखंडचे विमान तिकीट काढून दिले. त्यामुळे कामगारांना त्यांच्या घरी जाता आले. याबाबत बोलताना निहारीका म्हणाली, की समाजाने आपल्याला खूप काही दिले आहे. त्यामुळे संकटकाळात आपण त्याची परतफेड करणे हे आपले कर्तव्य असल्याचे तिने सांगितले. निहारीकाने केलेल्या या कामासाठी तिचे कौतुक होत आहे.