पिथौरागड - धारचुलामध्ये गेल्या 26 दिवसांपासून कॅम्पमध्ये असलेले 9 कामगार काली नदी पार करुन नेपाळमध्ये गेले आहेत. या घटनेनंतर जिल्हा प्रशासन हादरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शौचालयाला जात असल्याचे सांगत या नेपाळी कामगारांनी पोलीस दलाचा डोळा चुकवत काली नदीत उडी घेतली. यानंतर ते पोहत नदीच्या पलिकडे नेपाळच्या दिशेने गेले.
याठिकाणी जाताच नेपाळ पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेत क्वारंटाईन केले आहे. काही दिवसांपूर्वीच आणखी तीन कामगारही नदी पार करुन नेपाळला गेले होते. याच घटनांमुळे पोलिसांनी आता कॅम्पला ताळे ठोकले आहेत.
लॉकडाऊनमुळे अडकलेल्यांना धारचूलाच्या जवाहर सिंह मैदानात एका कॅम्पमध्ये ठेवण्यात आले आहे. लॉकडाऊननंतर भारत-नेपाळला जोडणारा झूलापुल बंद झाल्यामुळे हे कामगार कॅम्पमध्ये राहात आहेत. नेपाळी कामगारांचे म्हणणे आहे, की धारचूला प्रशासन आणि एनएचपीसीद्वारा त्यांच्या खाण्यापिण्याची उत्तम सुविधा केली गेली आहे. मात्र, नेपाळ सरकार आपल्या नागरिकांना घेऊन जाण्यासाठी तयार नाही.
अशा परिस्थितीत ज्यांना पोहायला येते, ते आपला जीव धोक्यात टाकून नदी पार करत आहेत. या घटनांमुळे जिल्हा प्रशासनाने स्टेडियमच्या बाहेर जाण्यास मनाई केली आहे. सध्या या कॅम्पमध्ये 327 कामगार आहेत.