नवी दिल्ली - देशात आता जनावरांनाही आधार नंबर मिळणार असून यासाठी सरकारी प्रकिया जोरात सुरू आहे. या योजनेतील जनावरांची वाढ करण्यात आली असून मेंढी, बकरी आणि डुक्कर यांचाही यात समावेश करण्यात आला आहे. देशातील जवळपास ५३.५ कोटी जनावरांना १२ आकडी आधार कार्ड देण्यात येणार आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार यामुळे जनावरांच्या रोगराईवर नियंत्रण मिळवण्याबरोबरच जनावरांविषयीच्या अनेक समस्या सोडवण्यास मदत होणार आहे.
सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून काही खासदारांनी विचारलेल्या प्रश्नावर लेखी उत्तर देताना मंत्री डॉ. संजीव कुमार बालियान यांनी ही माहिती दिली. जनावरांची आणि त्यांच्या आजारांची याद्वारे निश्चिती करता येईल. ५३.५ कोटी जनावरांना आधार कार्ड दिल्याने त्याचा मोठा माहिती साठा (डेटाबेस) भारताकडे असेल. या डेटाबेसमध्ये जनावरांची जात, दुधाचे उत्पादन, कृत्रिम रेतन, लसीकरण आणि पोषण यासंबंधीची माहिती असेल. राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाने जनावरांच्या उत्पादकता आणि आरोग्यासाठी ही माहिती प्रणाली विकसित केली आहे. राष्ट्रीय 'डेटाबेस'मध्ये प्राण्यांसाठी १२ अंकी विशिष्ट ओळख क्रमांक (यूआयडी) वापरला जात आहे, असे मंत्री बालियान यांनी सांगितले.
हेही वाचा - 'कृषी विधेयके शेतकरी हिताचीच, एमएसपी व्यवस्था कायम राहणार'
मंत्री म्हणाले की, भारत सरकार जनावरांचे वैज्ञानिक प्रजनन, रोगाचा प्रसार रोखण्यासाठी, दुग्धजन्य पदार्थांचा व्यापार वाढीच्या उद्देशाने १२ अंकी ओळख क्रमांक वापरुन दुभत्या गायी आणि म्हशींची माहिती गोळा करणार आहे.
प्राणी संजीवनी घटक योजनेंतर्गत हे काम राबविण्यात येत आहे, ज्याचा आता राष्ट्रीय गोकुळ मिशन योजनेत समावेश झाला आहे. जनावरांसह मेंढ्या, बकरी आणि डुकरांनाही आधार नंबर मिळणार आहे. आधार क्रमांकावरून प्राणी ओळखणे सोपे झाले आहे. या योजनेंतर्गत, प्रत्येक प्राण्यांच्या कानावर १२ अंकी आधार क्रमांक 'थर्माप्लास्टिक पॉलीयुरेथेन टॅग'द्वारे लावला जाणार आहे, अशी माहिती मंत्र्यांनी दिली.
हेही वाचा - राज्यसभेत विरोधकांचा प्रचंड गदारोळ व घोषणाबाजीत कृषीविषयक विधेयके मंजूर