नवी दिल्ली - मानवाने चंद्रावर पहिलं पाऊल ठेवल्याच्या अभूतपूर्व घटनेस आज (शनिवार) पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. २० जुलै १९६९ या दिवशी 'इगल' यानातून चंद्रावर उतरत नील आर्मस्ट्राँगने इतिहास घडवला. हा विजयोत्सव आज जगभरामध्ये साजरा केला जात आहे. ज्या काळात चंद्रावर स्वारी करणे अशक्य गोष्ट मानली जायची. त्या काळात मात्र, अमेरीकेने हा इतिहास घडवला होता.
या सगळ्या थरारक कहाणीची सुरुवात १९६१ सालीच झाली होती, जेव्हा रशियाचा स्पुटनिक उपग्रह अवकाशात घिरट्या घालू लागला होता. स्पुटनिकचे यश अमेरिकेला स्वस्थ बसू देत नव्हते. त्यामुळे अमेरिकेनेही अवकाश संशोधनात झेंडा रोवण्यासाठी महत्त्वाकांक्षी मोहीम हाती घेण्याचे ठरवले. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉन. एफ. केनेडी यांनी उपाध्यक्ष लिंडन जॉन्सन यांना बोलावून एक बैठक घेतली. यामध्ये रशियाला अवकाश संशोधनात मागे टाकण्याबाबतची चर्चा झाली. त्यानंतर नासाचे अध्यक्ष जेम्स वेब यांना मोहीम आखण्याबाबत निर्देश देण्यात आले, तेथून पुढे सुरु झाला प्रवास एका महत्त्वाकांक्षी मोहीमेचा..
चांद्रमोहीम फत्ते करण्यासाठी गरज होती कुशल टीमची. दुसऱ्या महायुद्घाच्या शेवटी नाझी जर्मनीचे आघाडीचे अवकाश तंत्रज्ञ व्हेनहर वोन ब्राऊन आणि त्यांच्या टीमने अमेरिकी सैन्यासमोर शरण पत्करले होते. या सर्वांना नंतर अमेरिकेच्या मिसाईल मोहिमेमध्ये सहभागी करुन घेण्यात आलं होतं. नासाची स्थापना झाल्यानंतर यासर्वांना नासामध्ये समाविष्ट करुन घेण्यात आले. या टीमकडे 'सॅटर्न' अग्निबाण बनविण्याचे काम देण्यात आले. तसेच या मोहिमेला 'अपोलो' असे नाव देण्यात आले.
१९६१ मध्ये अमेरिकेच्या संसदेत जॉन एफ केनेडी यांनी चंद्रावर माणूस पाठवण्याचे उदिष्ट असल्याचे सांगितले. तसेच ही मोहीम १९६० या दशकाच्या आत पूर्ण करण्याचा निर्धार केला.
अपोलो मोहिमेसाठी तब्बल ४ लाख लोकांनी काम केले. या मोहिमेंतर्गत एकून १७ मोहिमा राबण्यात आल्या. यशस्वी उड्डाणापूर्वी अनेकवेळा मानवरहित यान चंद्राभोवती पाठवण्यात आले. एका प्रयत्नात तर तीन अंतराळविरांचा मृत्यू झाला. त्यामुळे मोहीम बारगळते की, काय अशी शक्यता निर्माण झाली होती. या अपघातानंतर अनेक अपोलो उड्डाणे मानवरहित करण्यात आली. सर्व चाचण्याअंतीच चंद्रावर मावन उतरवण्याच्या मोहिमेला परवानगी देण्यात आली.
अपोलो मोहिमांसाठी १७ बिलियन अमेरिकी डॉलर यासाठी खर्च करण्यात आले. यातील अपोलो ११ या मोहिमेसाठी नील आर्मस्ट्राँग, बझ अॅल्ड्रीन मिशेल कॉलिन्स यांची निवड करण्यात आली. १६ जुलै १९६९ रोजी कोलंबिया यान उड्डाण करण्यास सज्ज झाले. जगभरामध्ये या मोहिमेचा गाजावाजा झाला होता. तब्बल १० लाख लोक यानाचे उड्डान पाहण्यास जमले होते. लोक घरातील रेडिओ आणि दूरचित्रवाणी संचाला चिटकून बसेल होते. आणि एकदाचे अपोलो यान अवकाशात झेपावले.
अडचणींचा सामना...
अपोलो यानाचा प्रवास पहिले ४ दिवस ठरल्याप्रमाणे झाला मात्र, यान चंद्रावर उतरण्याच्या आधीची २० मिनिटे काळजाचा ठोका चुकवणारी होती. अमेरिकेतील ह्यु्स्टन येथील नियंत्रण कक्षातील वातावरण तणावाचे बनले होते. या केंद्रावरुन यानाशी सतत संपर्क ठेवला जात होता. मात्र, यान उतरण्याच्या काही काळ आधी यानाचा रेडिओ केंद्राशी संपर्क तुटला. ईगल यान कोलंबिया या मुख्य यानापासून २ तास आधीच वेगळे झाले होते. इंधनसाठाही संपत आला होता. मात्र, यान चंद्राभोवती वेगाने फिरत होते. या वेगाने यान जर फिरत राहिले तर ज्या ठिकाणी उतरायचे त्याच्या कित्येक मैल पुढे जाण्याची भीती होती.
यानातील अंतराळवीरांनी मानवी पातळीवर यान खाली उतरवायचे ठरवले. त्यासाठी यानातील पोर्टहोलमधून ते खाली उतरण्यासाठी योग्य जागा शोधू लागले. मात्र, योग्य जागा मिळत नव्हती. इंधनही संपायला आले होते. अशा काळात पृथ्वीवरील केंद्राकडून आलेले संदेश ऐकावे की स्वत:च्या मनाने निर्णय घ्यावा याबाबत गोंधळ उडत होता. ३० सेकंद पुरेल इतके इंधन शिल्लक राहिले होते, तर यान उतरण्यास २० सेकंद वेळ होता. हा अंदाज जर चुकला असता तर मोठा अनर्थ घडण्याची शक्यता होती. मात्र, यान सुखरुप उतरल्याचा संदेश यानाने पृथ्वीवरील रेडिओ केंद्राला पाठवला.
चंद्रावरचे पहिले पाऊल....
सर्व ठिक असल्याचा रेडिओ संदेश त्यांनी पृथ्वीवरील ह्युस्टन केंद्रावर पाठवला. यान चंद्रावर स्थिर होताच आर्मस्ट्राँग शिडीवरुन खाली उतरले. त्यांच्यासाठी तो नजारा नवीनच होता. 'वन स्मॉल स्टेप फॉर मॅन, वन जायंट स्टेप फॉर मॅनकाइंड' असे उद्गार त्यांनी काढले. चंद्रावर मानवाने पहिले पाऊल ठेवले. चंद्रावर फिरताना त्यांनी तेथील काही खडकाचे नमुने बरोबर घेतले. अमेरिकेचा झेंडा चंद्रावर फडकावून कोलंबिया यानातून त्यांचा परतीचा प्रवास सुरु झाला.