लखनऊ - उत्तर प्रदेशातील संजय गांधी पोस्ट ग्रज्युएट इस्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्स (SGPGIMS) या कोविड रुग्णालयातील ५० टक्के रुग्णांना मधुमेह आजार असल्याची माहिती समोर आली आहे. जर कोरोनाबाधित रुग्णाला आधीच एखादा आजार असेल तर त्यास 'कोमॉर्बीडीटी' असे म्हटले जाते. अशा अवस्थेत रुग्णाच्या जीवाला धोका जास्त असतो.
रुग्णालयाचे अधीक्षक आर. के. सिंह यांच्यानुसार, मधुमेह आजार या रुग्णालयातील रुग्णांमध्ये सर्वसामान्यपणे आढळून येत आहे. त्यानंतर उच्च रक्तदाबाचे रुग्ण आहेत. ऑक्सिजनची कमतरता, किडनी आणि फुफ्फुसाचा आजार असणारेही रुग्ण असल्याची माहिती सिंह यांनी दिली. मधुमेहाचा आजार असणाऱ्या रुग्णांवर आरोग्य मंत्रालयाच्या नियमावलीनुसार उपचार करावे लागतात, असे त्यांनी सांगितले.
मधुमेहामुळे रुग्णाच्या शरिरातील विविध अवयवांना हानी पोहचते. त्यामुळे जर कोरोनाबाधित रुग्ण असेल तर त्याच्यावर उपचार करणं हे आमच्यापुढील मोठं आव्हान असते, असे सिंह यांनी सांगितले. आधीच आजार असलेल्या रुग्णांचे मृत्यू प्रमाणही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे रुग्णावर अतिशय बारकाईने लक्ष ठेवावे लागते. सुमारे ७५ टक्के मृत्यू झालेल्या रुग्णांना दुसरा आजार असल्याचे त्यांनी सांगितले.