नवी दिल्ली - करोना विषाणूवर मात करण्यासाठी देशभरामध्ये येत्या ३ मे पर्यंत लॉकडाउन करण्यात आले आहे. लॉकडाऊनच्या काळात कोणीही घराबाहेर पडू नये, घरात राहून कोरोनाविरोधात सामना करावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. मात्र, तरीही नागरिक या आवाहनाला गंभीर्याने घेत नसल्याचे समोर आले आहे. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिस यंत्रणेवर ताण पडत आहे. झारखंडमधील गोड्डा येथे धार्मिक स्थळी लोकांनी गर्दी केल्यानंतर सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे अवाहन करणाऱया पोलीस कर्मचाऱ्यावर जमावाने दगडफेक केली आहे.
ठाकुरगंगटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. यासंदर्भात पाच जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. महागामा ब्लॉकमधील काही लोक धार्मिक स्थळाजवळ जमले होते. यावेळी पोलिसांनी त्यांना सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे सांगितले. मात्र, त्यांनी पोलीसांवर दगडफेक सुरू केली. या हल्ल्यात तीन पोलिस जखमी झाले असून पोलीस गाडीचे नुकसान झाल्याचे पोलीस अधीक्षक शैलेंद्र प्रसाद बरनवाल यांनी सांगितले.
यापूर्वीही उत्तर प्रदेशातील काही जिल्ह्यांमध्ये पोलिसांवर हल्ला झाले होते. मध्य प्रदेशातही इंदूर व अन्य भागांत पोलिस व डॉक्टरांवर हल्ले झाले, ज्यात आरोपींवर कठोर कारवाई करण्यात आलेली आहे.
कोरोनाने देशात धुमाकूळ घातला आहे. सध्या सोशल डिस्टन्सिंग हाच कोरोनासाठी रामबाण उपाय आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे वारंवार आवाहन केले जात आहे. मात्र, अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडताना पाहायला मिळत आहे. लॉकडाऊनचे दिवस जसजसे वाढत चालले आहेत, तसे लोकांचा धीर सुटत चालला आहे. अनेक ठिकाणी सोशल डिस्टनसिंगचे नियम डावलून लोकं रस्त्यावर विनाकारण फिरताना दिसतात.