चेन्नई - प्रतिष्ठित समजला जाणाऱ्या माजा कोयेन पुरस्कारांचे १५ ऑगस्टला वितरण करण्यात आले. या पुरस्कारासाठी यंदाच्या वर्षी दिल्ली, केरळ आणि महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकारांची निवड करण्यात आली. तर नेपाळमधील चंद्रा किशोर यांना आंतरराष्ट्रीय शांती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
माजा कोयेन हा एक प्रतिष्ठित पुरस्कार आहे. समाजातून दारिद्र्य आणि अन्याय दूर करण्यासाठी तसेच लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी झटणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आणि शांततेचे पुरस्कर्ते यांना हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात येतो. तसेच जगातील कोणत्याही भागात शांती आणि अहिंसेला प्रोत्साहन देण्यासाठी काम करणाऱ्यांना शांती पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
दिवंगत माजा कोयेन यांच्या स्मृतिनिमित्त सन २००० साली भारताच्या सामाजिक व सांस्कृतिक संवाद केंद्र (सीईएससीआय) आणि स्वित्झर्लंड या दोन देशांनी संयुक्तपणे या पुरस्काराची घोषणा केली होती. तेव्हापासून या पुरस्कारांचे वितरण करण्यात येत आहे. तर मागील २० वर्षापासून आतापर्यंत ६६ सामाजिक कार्यकर्ते, २० पत्रकार आणि १२ शांती पुरस्कर्त्यांना माजा कोयेन या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
तर यंदा माजा कोयेन पुरस्कार २०१९ चे वितरण १५ ऑगस्ट २०१९ रोजी कडावूर येथील सीईएससीआयच्या सभागृहात करण्यात आले. या कार्यक्रमास मध्य प्रदेशचे माजी मुख्य सचिव शरदचंद्र बेहार, तमिळनाडूमधील स्वातंत्र्यसेनानी सरदार वेधरत्नम यांचे नातू वेधरत्नम, अभिनेता आणि निहाज नाटक संघाचे संस्थापक शानमुगराजन, सीईएससीआयचे सचिव आणि एकता परिषदेचे संस्थापक पी.व्ही. राजगोपाल, हरियाणा एकता परिषदेचे नेते राकेश तन्वर आदी मान्यवर उपस्थित होते.
हे आहेत यंदाचे माजा कोयेन पुरस्काराचे मानकरी -
विक्रम नायक, नवी दिल्ली - कलाकारा, सामाजिक कार्यकर्ते
बिनू थाथपारा, वायनाड, केरळ - कलाकार, सामाजिक कार्यकर्ते
विजय एस. बाहेकर, गोंदिया, महाराष्ट्र - सामाजिक कार्यकर्ते
प्रतीभा शिंदे, महाराष्ट्र - सामाजिक कार्यकर्ते
चंद्र किशोर, नेपाल - आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार