जम्मू - येथील चट्टा परिसरातून एक १४ वर्षीय मुलगा आठवड्याभरापूर्वी बेपत्ता झाला होता. त्याच्या बेपत्ता होण्याबाबत कुटुंबियांनी पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलीस त्याचा शोध घेत होते. दरम्यान, रविवारी रात्री या मुलाचा त्याच्याच घराजवळील परिसरात कुजलेल्या अवस्थेत मृतहेद आढळून आला. या प्रकरणी संतप्त कुटुंबियांनी सोमवारी आंदोलन करत निषेध नोंदविला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. रितीक असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.
माहितीनुसार, रितीकचे कुटुंब शहराच्या बाहेरील चट्टा परिसरात राहतात. १९ मे ला ९ व्या वर्गात शिकणारा रितीक त्याच्या घरातून बेपत्ता झाला होता. याप्रकरणी त्याच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. यानंतर पोलिसांचे शोधकार्य सुरू होते. मात्र, एक आठवडा होत आला असतानाही रितीकचा थांगपत्ता लागत नव्हता. अशातच, रविवारी रात्रीच्या वेळेस रितीकचा मृतदेह त्याच्याच घरानजीकच्या परिसरात कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी शासकीय मेडीकल कॉलेज येथे सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठलला. त्यानंतर, सोमवारी रितीकचा मृतदेह त्याच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात आला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मात्र, कुटुंबियांनी रितीकचा मृतदेह घेऊन जम्मू विमानतळ रोडवरील सतवारी चैकात याप्रकरणी आंदोलन करत निषेध नोंदविला. तसेच, या घटनेचा सखोल तपास करून या घटनेची सखोल चौकशी करुन दोषींना पकडून त्यावर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कुटुंबियांची भेट घेऊन आरोपींची ओळख पटवून तत्काळ अटक करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असे आश्वासन देऊन, रितीकच्या कुटुंबियांची समज काढली. यानंतर, हे आंदोलन शमले.
या घटनेबाबत माहिती देताना एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले, गेल्या आठवड्यात आम्ही रितीक रहस्यमयरित्या बेपत्ता झाल्यानंतर आम्ही अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. मात्र, आता या घटनेचे हत्या प्रकरणात रूपांतर झाले असून घटनेला वेगळे वळण प्राप्त झाले आहे. सध्या आम्ही मृताच्या शवविच्छेदन अहवाल येण्याची प्रतिक्षा करत असून हा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच रितीकच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे ते म्हणाले.