अहमदाबाद - राज्यामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने नर्मदा नदीवरील सरदार सरोवर धरणाचे १२ दरवाजे उघडण्यात आले आहेत. धराची पाणी पातळी १३१ मीटरपर्यंत पोहचली आहे. मागील २ वर्षातील पाणी पातळीचा हा उच्चांक आहे.
धरणक्षेत्रातील केवादिया भागामध्ये पाण्याची पातळी १३१ मीटर पर्यंत पोहचली आहे. मागील वर्षी धरणाची पाणी पातळी १११ मीटर पर्यंत पोहचली होती. धरण क्षेत्रामध्ये मागील १५ दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. पावसामुळे केवादिया आणि गोरा यांना जोडणारा पूल पाण्याखाली गेला आहे.
सुरत, वलसाड, भरुच, नर्मदा आणि डांगस जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे अनेक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. नर्मदा नदी पात्राच्या जवळ राहणाऱ्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. आपत्ती निवारण पथक आणि स्थानिक प्रशासनाच्या मदतीने मदत कार्यसुरु आहे.