लखनौ - दिल्लीतील तबलिगी जमात कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर उत्तर प्रदेशातील मेरठ येथील मशिदीमध्ये लपून बसलेल्या 10 जणांना तुरुंगवास झाला आहे. या दहा जणांमधील आठजण इंडोनेशियाचे नागरिक आहेत. 14 दिवस विलगीकरणात घालविल्यानंतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
मेरठ जिल्ह्यातील सरधाना येथील एका मशिदीमध्ये हे दहाजण लपून बसले होते. या प्रकरणी तपास करून सर्वांना ताब्यात घेण्यात आले होते. यातील एका व्यक्तीला कोरोना झाल्याचे चाचणीत स्पष्ट झाले होते. त्यामुळे इतरांना सुभ्रती रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवले होते.
या शुक्रवारी त्यांचा विलगीकरणाचा कार्यकाळ संपला. त्यानंतर सर्वांना सर छोट्टाराम इंजिनिअरिगं कॉलेज येथे तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेल्या तुरुंगात ठेवण्यात आले आहे. व्हिजा कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी आणि साथीचा आजार कायद्यांतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्लीतील तबलिगी जमात धार्मिक कार्यक्रमानंतर देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून आले होते.