बांदीपोरा (जम्मू काश्मीर) - जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांची घुसखोरी थांबत नसून नापाक कारावाया सुरूच आहेत. मात्र, भारतीय लष्कराकडून दहशतवाद्यांचा प्रत्येक कट उधळून लावण्यात येत आहे. शनिवारी म्हणजेच आज सकाळी बांदीपोरा भागात सुरक्षा दलांच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. शोधमोहीम अद्याप सुरूच आहे. तर जम्मू आणि काश्मीरच्या कृष्णा घाटी सेक्टर येथे 23 जुलै 2021 रोजी झालेल्या कारवाईत कृष्णा वैद्य हा जवान शहीद झाला आहे.
बांदीपोरा जिल्ह्यात सुंबलर परिसराच्या शोकबाबा जंगलात दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. माहितीच्या आधारे सुरक्षा दलाकडून शोधमोहीम राबवण्यात आली. यावेळी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर गोळीबार केला. यावर जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले. यात दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाला.
शुक्रवारी बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोरच्या वारपोरा भागात दोन अतिरेकी ठार झाल्याचे काश्मीर झोन पोलिसांनी शुक्रवारी सांगितले होते. यातील एक लष्कर-ए-तोयबाचा कमांडर इश्फाक दार उर्फ अबू अक्रम होता. अक्रम हा 2017 पासून या भागात सक्रिय होता आणि बर्याच दहशतवादी घटनांमध्येही त्याचा सहभाग होता.
शस्त्रास्त्रांची वाहतूक करणारे ड्रोन पाडले -
अखनूर जिल्ह्यातील कनाचक भागात सुरक्षा दलाने शुक्रवारी एक पाकिस्तानी ड्रोन पाडले. या ड्रोनमधून स्फोटक साहित्य करण्यात आली आहेत. तत्पूर्वी बुधवारीही, बकरीदच्या दिवशी सतवारी भागात एक संशयास्पद ड्रोन दिसले होते. मागील काही दिवसांपासून पाकिस्तानकडून भारतीय हद्दीत शस्त्रे आणि ड्रग्ज पुरवण्यासाठी मानवरहित ड्रोनचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे भारतीय सुरक्षा दलाची डोकेदुखी वाढली आहे. काही दिवसांपूर्वीच जम्मूमधील हवाई दल स्टेशनवर ड्रोन हल्ला झाला होता. या संशयी हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीर प्रशासनाने श्रीनगरमध्ये ड्रोनच्या वापरावर बंदी घातली आहे.
गेल्या सात महिन्यात 88 अतिरेकी ठार -
2021 मध्ये सुरक्षा दलांनी तब्बल 88 अतिरेकी ठार मारले आहेत. यातील एकट्या जुलैच्या पहिल्या दोन आठवड्यात 16 जणांना कंठस्नान घातले. आतापर्यंत दहशतवाद संबंधित विविध घटनांमध्ये सुरक्षा दलातील 19 जवान हुतात्मा झाले आहेत.जम्मू-काश्मीरच्या प्रदेशात शांती प्रस्थापित करणं अवघड आहे. पाकिस्तान आणि फुटिरतावादी या दोन घटकांमुळे या भागात कायम तणाव राहिला आहे. खोऱ्यामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी गेल्या कित्येक दशकांपासून करण्यात येत आहेत. मात्र, दहशतवादी कारवाया सुरूच आहेत. गेल्या दोन वर्षांमध्ये सुरक्षा दलांनी शेकडो दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. तसेच, बऱ्याच दहशतवाद्यांनी मुख्य प्रवाहात येण्यासाठी आत्मसमर्पणही केलं आहे