जयपूर : राजस्थानच्या जोधपूर तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या 'आसाराम बापू'लाही कोरोनाने गाठले आहे. ८४ वर्षांच्या आसारामची ३ मे रोजी कोरोना चाचणी करण्यात आली होती. बुधवारी सायंकाळी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला.
यानंतर तुरुंगात त्याची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान आसारामच्या शरीरातील ऑक्सिजन लेव्हल ९०पेक्षा कमी असल्याचे दिसून आले. त्यानंतर तुरुंग प्रशासनाने तातडीने त्याला रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला. यानंतर त्याला जोधपूर रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, रुग्णालयाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दुसरीकडे आसारामला रुग्णालयात नेल्याचे समजताच त्यांच्या समर्थकांनी रुग्णालयाबाहेर गर्दी केली. मात्र त्यांना रुग्णालयात प्रवेश देण्यात आला नसल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.
जोधपूरमध्ये कैद्यांना कोरोनाची लागण..
जोधपूर तुरुंगातील काही कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याचे काही दिवसांपूर्वी समोर आले होते. त्यानंतर तुरुंगातील सर्वांची कोरोना चाचणी करण्यात येत होती. यामध्येच आसारामचीही कोरोना चाचणी करण्यात आल्याचे तुरुंग प्रशासनाने स्पष्ट केले.
बलात्कारप्रकरणी आसाराम आहे तुरुंगात..
ऑगस्ट 2013मध्ये जोधपूर जवळील मनाई येथील आश्रमात एका अल्पवयीन मुलीवर केलेल्या बलात्कारप्रकरणी न्यायालयाने २०१८च्या एप्रिलमध्ये आसारामला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. याप्रकरणी शिल्पी आणि शरद या अन्य दोन आरोपींनादेखील 20 वर्षे तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
हेही वाचा : कोरोनाचा प्रसार वाढल्यामुळे हिमाचलमध्ये दहा दिवसांची संचारबंदी