चंदीगड : पंजाबमध्ये सलग तिसऱ्या दिवशी खलिस्तान समर्थक अमृतपालला अटक करण्यासाठी पोलिसांची कारवाई सुरूच आहे. रविवारी, पंजाबमध्ये अमृतपालसाठी सुरू केलेल्या शोध मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी, पोलिसांनी जालंधरच्या मेहतपूर भागात कार जप्त केली, ज्यामध्ये अमृतपाल शेवटचा दिसला होता. या कारमधून पोलिसांनी एक रायफल, गोळ्या आणि अमृतपालचा सबर जप्त केला आहे. अमृतपाल सिंग कार सोडून मोटारसायकलवरून पुढे गेल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
सिंगचा शोध अजूनही सुरू : खलिस्तान समर्थक धर्मांध प्रचारक अमृतपाल सिंग याचा काका आणि ड्रायव्हर जालंधरमध्ये पोलिसांसमोर सरेंडर केले, तर सिंगचा शोध अजूनही सुरू आहे. पोलिसांनी सोमवारी ही माहिती दिली. जालंधरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक (ग्रामीण) स्वर्णदीप सिंग यांनी सांगितले की, अमृतपालचे काका हरजित सिंग आणि ड्रायव्हर हरप्रीत सिंग यांनी रविवारी रात्री उशिरा जालंधरच्या मेहतपूर भागातील गुरुद्वाराजवळ सरेंडर केले.अमृतपालची महागडी कार ज्या व्यक्तीच्या नावावर आहे, त्याचा भाऊ ड्रग्ज तस्कर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. अशा वेळी या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेची (एनआयए) एन्ट्री कधीही होऊ शकते.
हेबियस कॉर्पस कायद्यांतर्गत उच्च न्यायालयात अर्ज : वारिस पंजाब संस्थेचे कायदेशीर सल्लागार इमान सिंग खारा यांनी अमृतपाल सिंग यांना न्यायालयात हजर करण्याच्या मागणीबाबत उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी हेबियस कॉर्पस अंतर्गत अर्ज दाखल केला. न्यायमूर्ती एन एस शिखरवत यांच्या निवासस्थानी ही सुनावणी झाली. पंजाब अॅडव्होकेट जर्नल आणि इमान सिंग खारा यांच्यात तब्बल दीड तास चर्चा चालली. त्यानंतर न्यायालयाने पंजाब सरकारला 21 मार्चपर्यंत उत्तर देण्यास सांगितले आहे.
संघटनेच्या 78 जणांना अटक केली : वरिष्ठ पोलीस अधीक्षक (एसएसपी) यांनी सांगितले की, सिंगचा शोध अजूनही सुरू आहे. राज्य पोलिसांनी आतापर्यंत अमृतपालच्या 112 समर्थकांना अटक केली आहे. अमृतपालच्या शोधासाठी पोलिसांनी रविवारी 'फ्लॅग मार्च' काढला आणि राज्यभर शोध मोहीम सुरू केली. पंजाब सरकारने अमृतपाल आणि त्याची संघटना 'वारीस पंजाब दे' विरोधात मोठी कारवाई सुरू केली आहे. पोलिसांनी संघटनेच्या 78 जणांना अटक केली आहे.
पंजाबमध्ये हाय अलर्ट जारी : मीडिया रिपोर्ट्सनुसार, पंजाब पोलिसांची कारवाई 19 मार्चलाही सुरू होती. आतापर्यंत पोलिसांनी 7 अवैध शस्त्रे, 300 हून अधिक गोळ्या आणि 3 वाहने जप्त केली आहेत. पोलिसांनी काही फोनही जप्त केले आहेत, जे प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. अमरीपाल सिंगच्या अटकेबाबत पंजाबमध्ये हाय अलर्ट जारी आहे. अमृतपाल सिंगचा फायनान्सर दलजीत सिंग कलसी यालाही पोलिसांनी अटक केली आहे. कलसीच्या फोनमध्ये पाकिस्तानचे काही नंबर सापडल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
आज दुपारी 12 वाजेपर्यंत इंटरनेट बंद : पंजाबमधील मोबाइल इंटरनेट आणि बल्क एसएमएस सेवेवरील बंदी सोमवारी दुपारी 12 वाजता संपत आहे. पोलिसांच्या विनंतीवरून, राज्य सरकारने शनिवारी दुपारी 12 वाजल्यापासून या सेवा 24 तासांसाठी निलंबित केल्या, त्या रविवारी आणखी 24 तासांसाठी वाढवण्यात आल्या. 'वारीस पंजाब दे'चा प्रमुख अमृतपाल सिंग देशात आहे की देशातून फरार झाला आहे, याबाबत अद्याप कोणतीही माहिती पोलिसांना मिळालेली नाही. अमृतपालच्या वडिलांनी अनुचित प्रकार घडण्याची भीती व्यक्त केली आहे. त्याचवेळी पंजाब आणि हरियाणा हायकोर्टात अमृतपालच्या संदर्भात हेबियस कॉर्पस याचिका दाखल करण्यात आली आहे.