अलवर - योगगुरु रामदेव बाबा यांच्या अडचणीत आता आणखी वाढ होण्याची चिन्हे दिसून येत आहेत. पतंजलीच्या नावाने तेलाची पॅकिग होत असून खाद्यतेलात भेसळ असल्याची माहिती मिळाल्यानंतर अलवर प्रशासनाने खाद्यतेल कारखाना सील केला आहे. यासह तेलाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. या मोहरीच्या तेलात भेसळ करण्यात येत असल्याचं तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल झाली होती. त्यानंतरही कारवाई करण्यात आली.
अन्न विभाग, आरोग्य विभाग, जिल्हा प्रशासन, औषध विभाग, वजन मापन विभाग, पॅकिंग विभाग या सर्व सरकारी विभागांच्या टीमने एकत्र कारखान्यावर छापा मारला आणि तपासणी केली. यावेळी कागदपत्रे आणि पॅकिंग परवाने खाद्य परवान्याची तपासणी करण्यात आली. तसेच अन्न निरीक्षकांनी मोहरीच्या तेलाचे वेगवेगळे नमुने घेतले.
अलवर एसडीएमसह मुख्य अधिकाऱ्यांची समिती गठित केली गेली आहे. ही समिती संपूर्ण प्रकरणाची चौकशी करेल. तेलामध्ये भेसळ होत असल्याची तक्रार मिळाली होती. त्याअंतर्गत ही संपूर्ण तेलाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून कारखाना सील केला आहे, असे तपास अधिकारी अलवर एसडीएम योगेश डागुर यांनी सांगितले.
तपास अहवाल आल्यानंतर कडक उपाययोजना केल्या जातील. कारखाना संचालकांकडून पॅकिंग व खाद्य विभागाचा परवाना मागविण्यात आला आहे. मीलमध्ये पतंजलीव्यतिरिक्त श्रीश्री कंपनीच्या पॅकिंगचे आवरण सापडले आहेत. त्यामुळे यासंदर्भात चौकशी सुरू आहे. या मीलमधून कोणाला तेल पुरवण्यात येत होते. कारखान्याकडे पॅकिंग परवाना आहे का? याची चौकशी करण्यात येत आहे. सर्व कागदपत्रांची बारकाईने छाननी केली जात आहे.