हरिद्वार - देशभरामध्ये कोरोनाची दुसरी लाट पसरली आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून अनेकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने अनेक निर्बंध लादले आहेत. महाराष्ट्र, गुजरात या राज्यांपाठोपाठ उत्तराखंडमध्येही रुग्णवाढ होताना दिसत आहे. हरिद्वारमधील महाकुंभमेळ्यात गेल्या पाच दिवसात जवळपास 2 हजारर 167 साधू व भक्तांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. या घटनेने प्रशासनाच्या चिंतेत भर टाकली आहे.
उत्तराखंड राज्य नियंत्रण कक्षानुसार 10 एप्रिल रोजी 254, 11 एप्रिलला 386, 12 एप्रिलला 408, 13 एप्रिलला 594 आणि 14 एप्रिलला 525 रुग्ण आढळले आहेत. कोरोना रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ असूनही कुंभमेळा 30 एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे.
निझामुद्दीन मरकझ येथे दिल्लीत मागील वर्षी झालेल्या कार्यक्रमात आणि हरिद्वारमधील कुंभची तुलना होऊ शकत नाही. महाकुंभ हा विशाल मोकळ्या जागेत आहे. तर मरकझ हे बंद दालनात होते. कुंभात 16 घाट आहेत. भाविक वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या घाटांवर स्नान करतात, असे उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथसिंग रावत मंगळवारी म्हणाले होते.
कुंभमेळ्यावर कोरोनाचे सावट -
कुंभमेळा हरिद्वारमध्ये सुरू असून 27 एप्रिल रोजी संपणार आहे. अलाहबाद म्हणजेच प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक या चार ठिकाणी कुंभमेळा भरतो. दर तीन वर्षांनी एका ठिकाणी, अशा प्रकारे बार वर्षांत या चारही ठिकाणी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. कुंभमेळा आणि त्याचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व हे जगभरात मान्यता पावले आहे. त्यामुळे कुंभमेळा पहायला केवळ भाविकच येतात असे नाही तर जगभरातून देशी आणि विदेशातील पर्यटक ही या सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी येतात. कुंभमेळा हे आर्थिक उलाढालीचे महत्त्वाचे केंद्र मानले जाते. मात्र, यंदा त्यावर कोरोनाचे सावट पडलं आहे.
हेही वाचा - पश्चिम बंगाल निवडणूक : दिलीप घोष यांच्यावर २४ तासांची प्रचार बंदी