नवी दिल्ली - ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवीन विषाणू सापडला आहे. त्यामुळे ब्रिटनहून भारतात येणारी विमाने २३ डिसेंबरपासून रद्द करण्यात आली आहेत. दरम्यान, मागील दोन दिवसांत ब्रिटनहून दिल्लीत आलेल्या ११ प्रवाशांना कोरोनाची लागण झाल्याचे चाचणीत स्पष्ट झाले आहे. मात्र, या प्रवाशांना विषाणूच्या नव्या प्रकाराचा संसर्ग झाल्याचे अद्याप स्पष्ट झाले नाही.
सुमारे १ हजार प्रवासी ब्रिटनमधून मागील दोन दिवसांत दिल्लीत आले आहेत. त्यांची विमानतळावरच आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली. यातील ५० प्रवाशांना क्वारंटाईन करण्यात आले असून इतरांनाही अलगीकरणात राहण्याच सल्ला देण्यात आला आहे.
हेही वाचा - ब्रिटनमधून मुंबईत आले १६८८ प्रवासी; एकही पॉझिटिव्ह नाही
ब्रिटनहून मुंबईला आलेले सर्व कोरोना निगेटिव्ह
मागील दोन दिवसात एकूण ५ पैकी ४ विमाने ब्रिटन येथून मुंबईत आली आहेत. या चार विमानातून एकूण १६८८ प्रवासी मुंबई एअरपोर्टवर उतरले. त्यापैकी एकालाही व्हायरसची लागण झाल्याचे समोर आलेले नाही. तरीही सुरक्षेचा उपाय म्हणून त्यांना हॉटेलमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
मुंबई एअरपोर्टवर ब्रिटनमधून आलेल्या प्रवाशांना क्वारंटाईन करण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर सर्व प्रवाशांना क्वारंटाईन केले जात आहे. सोमवारी - मंगळवारच्या रात्री काही प्रवाशांनी आमच्याकडे पैसे नसल्याने आम्ही क्वारंटाईन होणार नाही, आम्हाला आमच्या राज्यात घरी जाऊ द्या असे सांगितले आहे. यामुळे महाराष्ट्रातील सर्व प्रवाशांना मुंबईत हॉटेलमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे. ज्या प्रवाशांना त्यांच्या राज्यात जायचे आहे त्या राज्याच्या मुख्य सचिवांना तशा सूचना देण्यात आल्या असून त्यांच्या राज्यात त्या प्रवाशांना क्वारंटाईन केले जाणार आहे. तो पर्यंत त्या प्रवाशांना मुंबईत निगराणीखाली ठेवण्यात आल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.