विधानसभा निवडणूक 2024 : मुंबईत सकाळपासून मतदानाला सुरुवात; राज ठाकरे, उद्धव ठाकरेंची प्रतिष्ठा 'पणा'ला
Published : 4 hours ago
मुंबई : मायानगरीत आज सकाळपासून मतदानाला शांततेत सुरुवात झाली आहे. राज्यातील बिग फाईट पैकी एक असलेल्या माहीम विधानसभा मतदारसंघात आज सकाळपासूनच मतदारांनी मतदानासाठी रांग लावण्यास सुरुवात केलेली दिसून आली. यात अनेक तरुण मतदार असून ज्येष्ठ नागरिकांचा देखील तितकाच मतदानात सहभाग दिसून येत आहे. राज्यातील महत्त्वाच्या लढती पैकी एक असलेल्या माहीम विधानसभा मतदारसंघात राज ठाकरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. इथं त्यांचे चिरंजीव अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानं राज ठाकरे यांचे राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर, दुसरीकडं वरळी विधानसभा मतदारसंघात आदित्य ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात असल्यानं तिकडं उद्धव ठाकरे यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागले आहे.
विशेष म्हणजे माहीम आणि वरळी या दोन्ही विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होताना पाहायला मिळत आहे. दोन्ही शिवसेना एकमेकांविरोधात आहेत. तर, महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील या निवडणुकीच्या रिंगणात तितक्याच जोमानं उतरलेली दिसून येते. त्यामुळे या दोन्ही ठाकरे बंधूंचं भविष्य आज मतपेटीत कैद होणार असून, याचा निकाल शनिवारी 23 तारखेला जाहीर होईल. माहीम विधानसभा मतदारसंघात सकाळपासूनच मतदारांचा चांगला प्रतिसाद पाहायला मिळत आहे.