बापरे बाप! देव्हाऱ्यात निघाला भलामोठा साप, पाहा व्हिडिओ
Published : Dec 3, 2024, 3:59 PM IST
ठाणे : साप म्हटलं की फक्त भीतीनेच आपल्या अंगावर शहारे येतात. कधी-कधी साप अशा ठिकाणी येतात ज्याची आपण कल्पनाही केलेली नसते. अशावेळी किती भीती वाटते हे काय सांगायलो नको. आता असाच एक प्रकार समोर आला आहे. कल्याण पश्चिम भागातील सापर्डे गावातील एका बंगल्याच्या देव्हाऱ्यात भलामोठा साप निघाल्याची घटना घडली आहे. हा साप बंगल्यातील देव्हाऱ्यातील पूजेच्या वस्तू ठेवतात त्या कप्प्यात बसला होता. सकाळी देवपूजा करण्यासाठी कुटुंबातील एका सदस्यानं देव्हाऱ्यासमोर बसून कप्प्यातील अगरबत्ती काढताच त्यांना भलामोठा साप दिसला. भयभीत होऊन त्यांनी लगेच बंगल्याबाहेर पळ काढला. त्यानंतर बंगल्याच्या मालकांनी सर्पमित्र दत्ता बोंबे यांना संपर्क करून देव्हाऱ्यात भलामोठा साप असल्याची माहिती दिली. माहिती मिळताच सर्पमित्र घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कप्प्यात दडून बसलेल्या सापाला शिताफीनं पकडून पिशवीत बंद केलं. तर हा साप धामण जातीचा असून 6 फूट लांबीचा असल्याची माहिती दत्ता बोंबे यांनी दिली.