पुणे- 'विद्येचे माहेरघर' अशी ओळख असलेल्या पुण्यामध्ये दिवसेंदिवस गुन्ह्याचं प्रमाण वाढत आहे. बीपीओ कंपनीत काम करणाऱ्या सहकाऱ्यानं महिला कर्मचाऱ्याची धारदार शस्त्रानं वार करत हत्या केली. हा गुन्हा पुण्यातील येरवडा पोलीस स्टेशन हद्दीत घडला आहे. शुभदा कोदारे (28, रा. बालाजी नगर, कात्रज) असे मृत महिलेचं नाव आहे.
शहरातील येरवडा भागात असलेल्या बीपीओ कंपनीच्या पार्किंगच्या जागेत हत्या झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. आरोपी कृष्णा कनोजा हा कंपनीच्या अकाउंट्स विभागात काम करत होता. अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील यांनी हत्येबाबत माहिती देताना सांगितलं, ""प्राथमिक माहितीनुसार संशयितानं कंपनीच्या पार्किंगमध्ये संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास कोदारे यांच्या उजव्या कोपरावर धारदार शस्त्रानं वार केल्याचा आरोप आहे. उधारीच्या पैशातून हत्या झाल्याचं दिसून आलं आहे".
वार झाल्यांतर जागेवरच कोसळली-पोलिसांनी आरोपी कृष्णा सत्यनारायण कनोजा ( 30, रा. खैरेवाडी, शिवाजीनगर) याला अटक केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार येरवडा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मंगळवारी संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास बीपीओ कॉल सेंटरच्या इमारतीच्या पार्किंगमध्ये शुभदा कोदारे आणि कृष्णा कनोजा यांच्यात उधारीच्या पैशावरून वाद झाला. आरोपीनं तिच्या उजव्या कोपरावर धारदार शस्त्रानं जोरदार वार केला. हा वार इतका गंभीर होता की, शुभदा तिथे जागेवरच कोसळली. तिला तात्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं.
- उपचारादरम्यान सह्याद्री हॉस्पिटल येरवडा येथे तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी मृत तरुणीची बहीण साधना कोदरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटकदेखील केली आहे. याबाबत अधिक तपास सुरू असल्याचं पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी सांगितलं.
हेही वाचा-