जीना यहाँ मरना यहाँ; शालेय विद्यार्थ्यांनी साजरा केला 'द ग्रेटेस्ट शो मॅन' राज कपूर यांचा 100 वा वाढदिवस - RAJ KAPOOR 100TH BIRTH ANNIVERSARY
Published : Dec 14, 2024, 9:10 PM IST
पुणे : भारतीय चित्रपटसृष्टीत 'द ग्रेटेस्ट शो मॅन' म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते राज कपूर यांचा 100 वा वाढदिवस आज पुण्यातील शालेय विद्यार्थ्यांसोबत साजरा करण्यात आला. पुण्यातील साईनाथ मंडळ ट्रस्ट आणि श्री शिवाजी मित्र मंडळातर्फे सोमवार पेठेतील आबासाहेब अत्रे प्रशालेत राज कपूर यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अत्रे शाळेतील सुमारे 60 विद्यार्थ्यांनी राज कपूर यांचे मुखवटे लावून गायक मुकेश यांच्या आवाजातील गाण्यावर ताल धरला. तर पृथ्वीराज साळुंखे या बाल कलाकारानं राज कपूर यांच्या पेहरावात 'जीना यहाँ मरना यहाँ' या गीतावर नृत्य सादर केलं. 'व्हॉईस ऑफ मुकेश' अशी ओळख असलेले पपिशकुमार यांनी राज कपूर यांच्यावर चित्रित झालेली आणि त्यांनी गायलेली गीते याप्रसंगी सादर केली. यावेळी या शालेय विद्यार्थ्यांना साईनाथ मित्र मंडळाचे अध्यक्ष पीयूष शहा यांनी राज कपूर यांच्या चित्रपट सृष्टीतील योगदानाविषयी माहिती दिली.