साखळदंडात सापडलेल्या विदेशी महिलेच्या प्रकृतीत सुधारणा, तिला जंगलात कोणी आणून ठेवलं? - USA woman in Sindhudurg forest - USA WOMAN IN SINDHUDURG FOREST
Published : Jul 29, 2024, 9:55 AM IST
सावंतवाडी/सिंधुदुर्ग USA Woman In Sindhudurg Forest : सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली रोणापाल या घनदाट जंगलात झाडाला बांधून ठेवलेल्या अवस्थेत एक अमेरिकन महिला आढळून आली होती. पायाला साखळदंड बांधलेल्या अवस्थेत या महिलेला अज्ञात व्यक्तीनं बांधून ठेवलं होतं. दोन ते तीन दिवस ही महिला उपाशीपोटी पावसात भिजून पूर्णपणे गलितगात्र झाली होती. सध्या या महिलेवर ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून तिच्या तब्येतीत सुधारणा होत आहे. ती अमेरिकेची नागरिक असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय. मात्र, हे प्रकरण संवेदनशील असल्यामुळं पोलिसांनी याविषयी अधिक बोलण्यास नकार दिलाय. सध्या बांदा पोलीस या सर्व प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र, अमेरिकन नागरिक असलेल्या महिलेला सिंधुदुर्गातील अशा घनदाट जंगलात आणून कोणी आणि का बांधून ठेवलं? हा प्रश्न अनुत्तरित आहे. पोलिसांनी सध्या बोलण्यास नकार दिला असला तरी घटनेच्या तपासाअंती सर्व माहिती दिली जाईल, असं सांगण्यात आलंय.