बांगलादेशातील हिंसाचारावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून चिंता व्यक्त, केंद्र सरकारकडं 'ही' केली मागणी - RRS On Bangladesh violence
Published : Aug 9, 2024, 10:46 PM IST
नागपूर RRS On Bangladesh violence : बांगलादेशात गेल्या काही दिवसांत सत्ता परिवर्तन आंदोलनादरम्यान हिंदू, बौद्ध आणि इतर अल्पसंख्याक समुदायांविरुद्ध झालेल्या हिंसाचाराच्या घटनांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं (आरएसएस) चिंता व्यक्त केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी यासंदर्भात एक पत्रक जारी केलं आहे. बांगलादेशात, हिंदू आणि इतर अल्पसंख्याक समुदायांच्या हत्या, लूटमार, जाळपोळ, मंदिर, प्रार्थनास्थळांवर हल्ले असह्य आहेत. या घटनेचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं तीव्र निषेध केला आहे. बांगलादेशच्या अंतरिम सरकारनं अशा घटना ताबडतोब थांबवाव्यात. पीडितांचे जीवन, मालमत्ता आणि प्रतिष्ठेचं रक्षण करण्यासाठी योग्य व्यवस्था करावी. बांगलादेशातील अत्याचाराला बळी पडलेल्या हिंदू, बौद्ध इत्यादी समुदायांसोबत एकत्र उभं राहावं. बांगलादेशातील हिंदू, बौद्ध इत्यादी लोकांच्या सुरक्षेसाठी सर्वतोपरी प्रयत्न भारत सरकानं करावे, अशी विनंती राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं केलीय.