परभणी घटनेचे पडसाद; राहुरीत आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांचा बंद - PARBHANI SOMNATH SURYAVANSHI CASE
Published : 6 hours ago
शिर्डी (अहिल्यानगर) : परभणीमधील आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूप्रकरणी आज (18 डिसेंबर) राहुरी शहरात बंद पाळून निषेध करण्यात आला. आरपीआय पक्षाच्या वतीनं बंदचं आवाहन करण्यात आलं होतं. आरपीआयचे तालुकाध्यक्ष विलास साळवे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू घटनेच्या निषेधार्थ दुकानं बंद ठेवण्याचं आवाहन केलं. व्यापाऱ्यांनीही या आवाहनास प्रतिसाद देऊन दुपारी 12 पर्यंत सर्व दुकानं बंद ठेवली होती. घटनेच्या निषेधार्थ राहुरीचे तहसीलदार नामदेव पाटील, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन देण्यात आलं. मयत आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी यांना राहुरी बस स्थानक परिसरातील आरपीआय कार्यालयात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी तालुकाध्यक्ष विलास साळवे, तालुका उपाध्यक्ष सुनील चांदणे, यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे. या पुतळ्यासमोर एका इसमानं संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केली. ही घटना समोर येताच शहरातील भीमसैनिकांकडून शहर बंद आंदोलन करण्यात आलं होतं. या घटनेनंतर पोलिसांनी काही भीमसैनिकांना ताब्यात घेतलं होतं. त्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी याचाही समावेश होता. सोमनाथ सूर्यवंशी हा न्यायालयीन कोठडीत असताना त्याचा मृत्यू झाला होता.