नायलॉनच्या मांजाचा घुबडाला 'अपशकुन', अग्निशमन दलाच्या जवानांनी झाडावरून केली सुटका - NYLON MANJA ISSUE
Published : Dec 28, 2024, 1:51 PM IST
|Updated : Dec 28, 2024, 2:37 PM IST
पुणे- देशात अनेक ठिकाणी घुबड पाहणंच नव्हे तर या पक्षाचं नाव घेणंदेखील अशुभ मानलं जातं. मात्र, कायद्यानं बंदी असलेल्या नायलॉनचा मांजाचा वापरच घुबडासाठी 'अपशकुनी' म्हणजेच जीवघेणा ठरत आहे. या नायलॉन मांजामुळे अनेकांना दुखापतीदेखील होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. असे असताना पुण्यातील भांबुर्डा वनविभागाच्या परिसरात नायलॉन मांजाचा वापर करून पतंग उडवण्यात आल्या. या तुटलेल्या पतंगाचा मांजा झाडावर अडकला. मांजातून बाहेर न पडता आल्यानं तिथे घुबड अडकलं. ही माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी अतिशय तत्परतेनं नायलॉन मांजामध्ये अडकलेल्या घुबडाला जीवनदान दिलं. अग्निशमन दलाचे निलेश महाजन आणि एरंडवना विभागाच्या सर्व जवानांनी अतिशय मेहनत घेत नायलॉन मांजामध्ये अडकलेल्या घुबडाला जीवनदान दिलं आहे. या प्रकारामुळे संक्रांतीच्या काळात नायलॉन मांज्याच्या आधारे पतंग उडवण्याचा अनेकांचा सोस प्राण्यांच्या प्राणावर बेतू शकतो, हे पुन्हा अधोरेखित झालं आहे.