"...मग सरसंघचालक नियम बदलायला लावतील का?", मोहन भागवतांच्या 'त्या' विधानावर सामान्य नागरिकांच्या तिखट प्रतिक्रिया - MOHAN BHAGWAT STATEMENT
Published : Dec 3, 2024, 10:04 AM IST
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी घटत्या लोकसंख्येवर चिंता व्यक्त केली. "सध्याची लोकसंख्या कमी होत आहे, हा चिंतेचा विषय आहे. लोकसंख्या शास्त्र सांगतो की, लोकसंख्या वाढीचा दर 2.1 पेक्षा कमी व्हायला नको. त्यामुळं किमान तीन अपत्य जन्माला घालावीत", असं मत मोहन भागवत यांनी व्यक्त केलंय. नागपुरात कठाळे कुल संमेलनात बोलताना त्यांनी हे विधान केलं. मोहन भागवत यांच्या या विधानावर विविध क्षेत्रातून प्रतिक्रिया उमटत असतानाच आता सामान्य नागरिकांनी त्यांच्या विधानाचा विरोध केलाय. आजच्या महागाईच्या काळात एका अपत्याचं पालन पोषण करणंही शक्य नसताना तीन अपत्य पोसायची कशी? असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केलाय. तसंच जर तीन अपत्य जन्माला घातले तर त्यांना भविष्यात कोणती निवडणूक लढता येणार नाही. त्यांना सरकारी नोकरी मिळू शकणार नाही. मग सरसंघचालक नियम बदलायला लावतील का? असा सवाल देखील नागरिक उपस्थित करत आहेत.