उपमहाराष्ट्र केसरी तर झाला, पण बक्षीसच मिळालं नाही; काय म्हणाला महेंद्र गायकवाड? - MAHENDRA GAIKWAD
Published : Feb 17, 2025, 10:57 PM IST
पुणे : नुकतंच अहिल्यानगर येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मोठा गोंधळ झालेला पाहायला मिळाला. या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पैलवान पृथ्वीराज मोहोळ हा महाराष्ट्र केसरी झाला आहे. तर महेंद्र गायकवाड हा उपमहाराष्ट्र केसरी झाला आहे. स्पर्धा होऊन १५ दिवस झाले असून अजूनही उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाडला बक्षिसाची रक्कम देण्यात आली नाही. याबाबतची थेट नाराजी महेंद्र गायकवाडने बोलून दाखवली.
यावेळी महेंद्र गायकवाड म्हणाला की, "अहिल्यानगर येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मी उपमहाराष्ट्र केसरी झालो आहे. या स्पर्धेत उपकेसरीला बोलेरो गाडी बक्षीस होती. मात्र ती मला मिळाली नाही. या स्पर्धेत राजकारण सुरू असल्यामुळं मला बक्षीस मिळालं नाही. दोन दिवसांपूर्वी आयोजकांनी मला बोलवलं होतं. मात्र, बक्षीसच दिलं नाही. जे काही कुस्तीत चाललं आहे ते चुकीचं असून याचा फटका आम्हा पैलवानांना बसत आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद आणि महाराष्ट्र कुस्तीगीर संघानं एकत्र येऊन काम करावं. जेणेकरून पैलवानांचं नुकसान होणार नाही. जर असंच सुरू राहिलं तर पुढील काळात पैलवानकी धोक्यात येईल".