काँग्रेसमधून सहा वर्षांसाठी निलंबित उल्हास पाटील यांची उद्विग्न प्रतिक्रिया, पाहा काय म्हणाले? - केतकी पाटील
Published : Jan 23, 2024, 10:19 AM IST
जळगाव Ulhas Patil News : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केलं आहे. डॉ. उल्हास पाटील त्यांच्या पत्नी डॉ. वर्षा पाटील या दोघांसह काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, काँग्रेसकडून करण्यात आलेल्या या कारवाईनंतर उल्हास पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर भूमिका स्पष्ट केली. काँग्रेसमध्ये एकाधिकारशाही दिसत असून कुठलीही विचारणा किंवा नोटीस न देता कारवाई केल्याबद्दल उल्हास पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. तसंच “मला दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास निलंबित केल्याचं पत्र मिळालं. मात्र कुठलाही विचार न करता थेट कारवाई केल्यामुळं आता त्यांना विचारायचं काय?”, असा प्रश्न उल्हास पाटील यांनी उपस्थित केला. यावेळी भाजपात प्रवेश करणार का? असा प्रश्न विचारण्यात आला असता “कारवाई झाल्यामुळं आता दुसरा काहीतरी विचार करावा लागेल”, असं म्हणत पत्नी वर्षा पाटील आणि कन्या केतकी पाटील सोबत लवकरच भाजपामध्ये पक्षप्रवेश करणार असल्याचे त्यांनी संकेत दिले.