महायुती सरकारचं खातेवाटप कधी होणार? गुलाबराव पाटील म्हणाले... - MH CABINET PORTFOLIO DISTRIBUTION
Published : Dec 21, 2024, 9:06 AM IST
जळगाव : महायुती सरकारच्या बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळाचा विस्तार तर झाला पण खातेवाटप व्हायचं काही नाव घेईना. नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या आदल्या दिवशी मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. मात्र, आता हिवाळी अधिवेशनही आटोपत आलं, तरी मंत्र्यांना खातेवाटप जाहीर झालेलं नाही. त्यामुळं हे अधिवेशन बिनखात्याच्या मंत्र्यांविनाच पार पडताना दिसतंय. दरम्यान, असं असतानाच आता मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी एक-दोन दिवसात खातेवाटप जाहीर होईल, असा दावा केलाय. मंत्रिपद मिळाल्यानंतर शुक्रवारी (20 डिसेंबर) ढोल ताशांच्या गजरात गुलाबराव पाटील यांचं जळगाव जिल्ह्यात आगमन झालं. यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी खातेवाटपा संदर्भात भाष्य केलं. ते म्हणाले, " मंत्रिपद मिळाल्याबरोबर माझं काम सुरू झालंय. खातेवाटपाला कोणताही विलंब झालेला नाही. एक-दोन खात्याबाबत चर्चा सुरू होती. पण आता एक-दोन दिवसात खातेवाटप पूर्ण होईल."