दुर्गापूर परिसरात मुक्तसंचार करणारा बिबट्या जेरबंद; आणखी एकाचा शोध सुरू - दुर्गापूरमध्ये बिबट्या जेरबंद
Published : Feb 16, 2024, 7:53 PM IST
चंद्रपूर Leopard Jailed In Durgapur : मानव-वन्यजीव संघर्षासाठी संवेदनशील असलेल्या दुर्गापूर परिसरात मुक्तसंचार करणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात अखेर वनविभागाला यश आलं. गुरुवारी रात्री (ता. 15) हा बिबट्या जेरबंद झाला आणि सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला. मात्र, दुसरा बिबट्या अद्याप बाहेर आला नाही. त्याला पकडण्यासाठी वनविभाग प्रयत्न करीत आहे. दुर्गापूर वसाहतीच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून दोन बिबट्यांचा मुक्तसंचार होता. या बिबट्यांनी अनेक कुत्र्यांची शिकार केली. यापूर्वी बिबट्यांनी अनेक लोकांचे बळी घेतले असल्याने हा परिसर मानव वन्यजीव संघर्षाच्या दृष्टीने संवेदनशील आहे. त्यामुळे या बिबट्यांना जेरबंद करण्याचे मोठे आव्हान वनविभागासमोर होते. त्यानुसार गेल्या चार दिवसांपासून वनविभागाने या परिसरात सापळे लावले होते. त्यात एक बिबट्या काल जेरबंद झाला. चंद्रपूर शहराला लागूनच दुर्गापूर वसलेले आहे. त्याला लागूनच ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाचे क्षेत्र सुरू होते. या ठिकाणी मानव-वन्यजीव संघर्ष शिगेला पोहोचला आहे. मागील चार वर्षांत या परिसरातील तब्बल 13 लोकांना वाघ आणि बिबट्याने आपले शिकार बनवले.