प्रजासत्ताक दिन 2024 : देशाच्या प्रगतीत महाराष्ट्र मोठा वाटा, अमृत महोत्सवी वर्षात मागं राहणार नाही : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Published : Jan 26, 2024, 9:15 PM IST
मुंबई Eknath Shinde On Republic Day 2024: भारताच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण केलं. देशाच्या अमृत महोत्सवी वर्षात प्रगती साधली जात असताना महाराष्ट्रही त्यात मागं राहणार नाही, असं यावेळी एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं. तर पद्म पुरस्कार विजेत्या सर्व विजेत्यांना त्यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी आज सकाळी भारताच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण केलं आणि ध्वज वंदना दिली. यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं की, "भारताच्या अमृत महोत्सवी वर्षांमध्ये आपण पदार्पण करत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगती करत आहे. देशाची प्रगती होत असताना आता महाराष्ट्रही मागं राहणार नाही. या प्रगतीत महाराष्ट्राचा नक्कीच मोठा वाटा असेल, असं त्यांनी यावेळी सांगितलं. प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यातील सर्व जनतेला त्यांनी शुभेच्छा दिल्या. देशाच्या नागरी पुरस्कारातील मानाचे पद्म पुरस्कार जाहीर झालेल्या मान्यवरांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केलं आहे. राज्यातील विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्यांतील सहा मान्यवरांना पद्मभूषण आणि सहा मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. पद्मभूषण पुरस्कार जाहीर झालेल्यांमध्ये होरमुसजी एन. कामा (साहित्य-शिक्षण-पत्रकारिता), आश्वीन मेहता (वैद्यकीय), राम नाईक (सार्वजनिक क्षेत्र), राजदत्त तथा दत्तात्रय मायाळू (कला), प्यारेलाल शर्मा (कला), कुंदन व्यास (साहित्य-शिक्षण) तसेच पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेल्यांमध्ये उदय देशपांडे (क्रीडा मल्लखांब प्रशिक्षण), मनोहर डोळे आणि चंद्रशेखर मेश्राम (वैद्यकीय सेवा), जहीर काझी (साहित्य व शिक्षण), श्रीमती कल्पना मोरपारिया (उद्योग व व्यापार), शंकर बाबा पापळकर (सामाजिक कार्य) यांचा समावेश आहे. या सर्वांचं मुख्यमंत्री शिंदे यांनी अभिनंदन केलं आहे.