शेंडीतला नर बिबट्या अखेर जेरबंद, वनविभागाच्या पिंजऱ्यात जनावर अलगद अडकलं, मादीलाही लवकरच पकडणार - SHENDI MALE LEOPARD CAPTURED
🎬 Watch Now: Feature Video
Published : Nov 26, 2024, 12:52 PM IST
अहिल्यानगर - जिल्ह्यातील राजुर येथील प्रादेशिक वनविभागानं शेंडी येथे लावलेल्या पिंज-यामध्ये तीन वर्षीय बिबट्या जेरबंद झाला असल्यानं परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी शेंडी येथील गोगाशेट भांगरे या शेतकऱ्यानं वनविभागाकडे केली होती.
अकोले तालुक्यातील शेंडी येथील गोगाशेट भांगरे यांच्या वस्तीच्या आसपास उसाचं क्षेत्र असल्यानं बऱ्याच दिवसापांसून बिबट्याचा वावर होता. बिबट्यानं भांगरे यांच्या वस्तीवरून चार कुत्रे, तीन मांजरं तसंच कोंबड्यांचा फडशा पाडला होता. हा बिबट्या दररोज दिवसाढवळ्या तसंच संध्याकाळी सहा वाजेच्या दरम्यान भांगरे यांच्या वस्तीच्या परिसरात खुलेआम वावरत होता. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं होतं. राजूर येथील प्रादेशिक वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी दत्तात्रय पडवळे आणि वनपाल पटेल यांच्या कानावर सदर माहिती भांगरे यांनी घालून पिंजरा लावण्याची मागणी केली होती. राजूरच्या प्रादेशिक वन विभागाने रविवारी भांगरे यांच्या वस्तीजवळ पिंजरा लावला होता. सोमवारी रात्री अखेर तीन वर्षीय बिबट्या जेरबंद झाला. मादी बिबट्याही लवकरच जेरबंद करण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी दत्तात्रय पडवळे यांनी दिली आहे.