पिपाडा दांपत्याला बंड मागे घेण्यासाठी बोलवलं मुंबईत; चक्क शिर्डीत पाठवलं विशेष विमान
Published : 4 hours ago
शिर्डी : शिर्डी विधानसभा मतदारसंघातून महसूल मंत्री तथा भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhepatil) यांच्याविरोधात भाजपामधील राजेंद्र पिपाडा (Rajendra Pipada) आणि त्यांच्या पत्नी ममता पिपाडा यांनी बैलगाडीतून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 4 नोव्हेंबरपर्यंत आहे. महायुतीनं नेत्यांशी संपर्क करण्यास सुरूवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून भाजपाने शिर्डी विमानतळावर विशेष विमान पाठवून बुधवारी पिपाडा यांना मुंबईला बोलवून घेतलं. मुंबईत पिपाडा यांची पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत बैठक झाली. याला पिपाडा यांनी 'ई टीव्ही भारत' शी बोलताना दुजोरा दिला. पक्षातील आणि मतदारसंघातील अडचणी पिपाडा यांनी पक्षासमोर मांडल्या. आपण कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेणार असल्याचं पिपाडा यांनी सांगितलं.