पुण्यात राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपाचे आंदोलन, कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी - BJP agitation - BJP AGITATION
Published : Sep 13, 2024, 3:54 PM IST
पुणे BJP agitation: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आरक्षणाविषयी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी तसंच कार्यकर्त्यांकडून राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालय येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे म्हणाले की, राहुल गांधी यांनी जे आरक्षणाच्याबाबत वक्तव्य केलं आहे, त्याच्या विरोधात आज भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे. राहुल गांधी यांच्या मनातील ओठांवर आलं आहे. काँग्रेसकडून संविधानात अनेकवेळा बदल केला गेला आहे. लोकसभा निवडणुकीवेळी मात्र काँग्रेसकडून संविधान बदलणार म्हणून नरेटिव्ह सेट केलं गेलं. काँग्रेसची भूमिका ही दुटप्पीच राहिली आहे. राहुल गांधी जोपर्यंत माफी मागत नाहीत तोपर्यंत भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती जमाती मोर्चा आंदोलनं करत राहणार असल्याचा इशारा यावेळी कांबळे यांनी दिला.