हैदराबाद : गेल्या काही दिवसापासून, ओला आणि उबरवर फोननुसार वापरकर्त्यांकडून वेगवेगळे भाडे आकारल्याचा आरोप होत आहे. आयफोनवरून कॅब बुक केल्यास भाडं अँड्रॉइडपेक्षा जास्त आकारलं जातं, असा आरोप काही ग्राहकांनी केलाय. सरकारनं या कंपन्यांना याबाबत नोटीस पाठवली होती. आता या प्रकरणात उबरची प्रतिक्रिया आली आहे. संपूर्ण प्रकरण काय आहे आणि उबरनं काय प्रतिसाद दिला आहे जाणून घेऊया...
सरकारनं पाठवली होती नोटीस
केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट करून माहिती दिली की, वेगवेगळ्या मॉडेल्सच्या मोबाईल फोनवर आधारित वेगवेगळे भाडे आकारल्याबद्दल ओला आणि उबरला नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांच्याकडून उत्तर मागितण्यात आलं आहे. जोशी यांनी असं वेगवेगळं भाडं आकारणे अन्याय्यकारक असल्याचं म्हटलं होतं. कंपनी असं भाडं आकारून ग्राहकांच्या हक्कांचे उल्लंघन करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. दुसरीकडं अनेकांनी सोशल मीडियावर त्यांचे अनुभव शेअर करत उबर आयफोन आणि अँड्रॉइडवर एकाच राईडसाठी वेगवेगळे शुल्क आकारल्याचा आरोप केलाय.
उबरने फेटाळले आरोप
नोटीस मिळाल्यानंतर, उबरने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. कंपनीच्या प्रवक्त्यानं सांगितलं की, भाडे रायडरच्या फोन नंबरवर आधारित ठरवलं जात नाही. कंपनी सरकारच्या सहकार्यानं हा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करेल. कंपनीनं त्यांच्या वेबसाइटवर लिहिलं आहे की, ते प्रवासाचे अंदाजे अंतर आणि वेळेनुसार भाडे ठरवते. मागणी तसंच रहदारी यासारख्या घटकांमुळं किंमतीत थोडाफार बदल होऊ शकतो, असं कंपनीनं म्हटलंय.
ग्राहकांच्या हक्कांचं रक्षण करण्यासाठी प्रयत्न
केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणानं (CCPA) या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. जर चौकशीदरम्यान आरोप खरे आढळले तर या कंपन्यांवर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. या संदर्भात उबरनं आरोपाचं खंडण केलंय असून ओलानं कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाहीय.
हे वाचलंत का :
- एअरटेलची लवकरच सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू होणार, स्टारलिंक आणि जिओ कंपनीला आव्हान, गावातही चालणार भन्नाट इंटरनेट
- जिओ आणि एअरटेलचे व्हॉइस ओनली रिचार्ज प्लॅन लॉंच, कोणाचा प्लॅन सर्वात स्वस्त?
- रॉयल एनफील्ड स्क्रॅम 440 भारतात लाँच, किंमत, वैशिष्ट्यासह बरेच काही जाणून घ्या...