हैदराबाद :मारुती सुझुकीसोबतच्या भागीदारीनंतर टोयोटानं मारुती कारचे विविध रिबॅज्ड मॉडेल्स बाजारात आणले आहेत. तेव्हापासून कंपनीच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाली आहे. Toyota Urban Cruiser Hyrider ही कंपनीच्या पोर्टफोलिओमधली दुसरी मारुती रीबॅजेड कार बनली आहे. जिची भारतातील घाऊक विक्री 1 लाख युनिट्सहून अधिक झाली आहे.
कंपनीची पहिली रिबॅज केलेली कार :टोयोटानं सप्टेंबर महिन्यातच ही कामगिरी केली होती. ऑक्टोबरच्या अखेरीस या कारच्या एकूण 1 लाख 7 हजार 975 युनिट्सची विक्री झाली होती. कंपनीनं ही कार सप्टेंबर 2022 मध्ये लॉंच केली होती. मारुती बलेनोपासून बनवलेली टोयोटा ग्लान्झा हॅचबॅक ही कंपनीची पहिली रिबॅज केलेली कार होती. या कारच्या 1 लाख युनिट्सची विक्रीही नोंदवली गेलीय. कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार ऑक्टोबरच्या अखेरीस त्यांनी या हॅचबॅकच्या 1 लाख 91 हजार 29 युनिट्स डीलरशिपला पाठवल्या आहेत. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सात महिन्यांत (एप्रिल ते ऑक्टोबर) टोयोटा हैदरची विक्री वार्षिक 52 टक्क्यांनी (YoY) वाढून 36 हजार 220 युनिट्स झाली आहे.