हैदराबाद Shoulder Helmet : मानवानं बदलत्या काळाबरोबर तंत्रज्ञानात देखील प्रगती केलीय. शेतीच्या शोधापासून ते मंगळावर जाण्यापर्यंत मानवानं मजल मारली आहे. आजही मानवाचं शोधाचं काम निरंतर सुरुच आहे. अशा शोधामुळं मानवी जीवन सुखकर होताना दिसत आहेत. तसंच तंत्रज्ञानाच्या उपयोगामुळं मानवी जीवनाची हानी कमी होताना दिसतेय. प्रत्येक जणाला आज दुचाकीचं वेड आहे. दुचाकी आज प्रत्येक कामासाठी वापरली जाते. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव अनेक जण हेल्मेट न घालता निष्काळजीपणा करताना दिसून येतात. त्यामागं दुचाकी चालक अनेक कारण देतात. हेल्मेट घातल्यानं केस गळतात, अशीही शंका काहींच्या मनात आहे. हे लक्षात घेऊन एका तरुणानं हेल्मेट डिझाइन केलं आहे. आता त्या हेल्मेटमध्ये काय खास आहे ते पाहूया.
शोल्डर हेल्मेट डिझाइन :हेल्मेट दुचाकीस्वारांसाठी जीवन संरक्षक म्हणून काम करतं. यासाठी वाहतूक पोलीस अनेक जनजागृती कार्यक्रमांतून दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्तीचं करण्याचं आवाहन करत आहेत. तरीही काहीजण या आवाहनाकडं दुर्लक्ष करून आपला जीव धोक्यात घालतात. शहरीकरणाचा भाग म्हणून वाहनांचा वापर प्रचंड वाढला आहे. बहुतांश रस्त्यांवर दुचाकी वाहनांची गर्दी असते. मात्र वाहनचालक सुरक्षेचे नियम पाळताना दिसत नाहीत. त्यामुळंच एका तरुणानं अनोख हेल्मेट तयार केलं आहे. या तरुणानं खांद्याला आधार देणारे हेल्मेट बनवलं आहे. त्यामुळं ज्यांना केस गळण्याची भीती आहे, अशा दुचाकी चालकांना या हेल्मेटचा उपयोग होणार आहे. फणीकुमार, असं या तरुणाचं नाव आहे. तो कर्नाटकातील गुंटूर जिल्ह्यातील वेलपुरा येथील रहिवासी आहे. भीमावरममध्ये M.Sc पूर्ण केल्यानंतर तो कामानिमित्त हैदराबादला आला होता. तिथं नॅटको फार्मा कंपनीत ईएचएस म्हणून त्यानं 2 वर्षे काम केलं. त्यानंतर त्यांनी जेएनटीयू कॉलेजमधून पर्यावरण शास्त्रात पीएचडी पूर्ण केली.