हैदराबाद : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) गुरुवारी सकाळी दोन भारतीय उपग्रहांना अवकाशात (डॉक) एकामेकांन जोडण्यात यशस्वी झालीय. सकाळी 10 वाजता इस्रोनं डॉकिंग यशस्वी झाल्याची घोषणा केली. त्यामुळं भारत यशस्वी स्पेस डॉकिंग साध्य करणारा चौथा देश बनलाय. डॉकिंग ही एक अतिशय गुंतागुंतीची प्रक्रिया आहे आणि इस्रोने पंधरा दिवसांत अनेक चाचण्या करून सावधगिरीनं डॉकिंग करण्याचा प्रयत्न केलाय. भारतानं स्वदेशी विकसित केलेल्या भारतीय डॉकिंग सिस्टीमचा वापर करून हे यश मिळवलं.
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं (इस्रो) गुरुवारी 'स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट' (SPADEX) अंतर्गत उपग्रह यशस्वीरित्या डॉक (एकामेंकाना जोडले) केले. 'भारतानं अंतराळ इतिहासात आपलं नाव कोरलं आहे. 'इस्रोच्या स्पेडएक्स मोहिमेला 'डॉकिंग' मध्ये ऐतिहासिक यश मिळालं आहे'. - इस्रो
उपग्रहांच्या डॉकिंगची चाचणी
यापूर्वी 12 जानेवारी रोजी, इस्रोनं दोन अंतराळयानांना तीन मीटर अंतरावर आणून आणि नंतर त्यांना सुरक्षित अंतरावर परत पाठवून उपग्रहांच्या डॉकिंगची चाचणी घेतली होती. इस्रोनं 30 डिसेंबर 2024 रोजी 'स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट' (SPADEX) मिशन यशस्वीरित्या लाँच केलं होतं. इस्रोनं रात्री 10 वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्र (SHAR) येथून स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट (SPADEX) लाँच केलं होतं. या मोहिमेचं यश भारतीय अंतराळ केंद्राच्या स्थापनेसाठी आणि चांद्रयान-4 सारख्या मानवी अंतराळ मोहिमांसाठी महत्त्वाचं ठरणार आहे. मिशन डायरेक्टर एम. जयकुमार म्हणाले, 44.5 मीटर लांबीच्या PSLV-C60 रॉकेटमध्ये दोन अंतराळयान, चेसर (SDX01) आणि लक्ष्य (SDX02) होते.