हैदराबाद :इस्रोनं पुन्हा एकदा, स्पाडेक्स मोहिमेचं डॉकिंग स्थगितल केलंय. इस्रो X वरील एका पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "उपग्रहांमधील अंतर 225 मीटरपर्यंत काम सुरू असताना दोन्ही उपग्राहामधील अंतर अपेक्षेपेक्षा जास्त असल्याचं आढळून आलं. त्यामुळं उद्याचं नियोजित डॉकिंग पुढं ढकलण्यात आलं आहे. दोन्ही उपग्रह सुरक्षित आहेत असल्याचं देखील इस्त्रोनं म्हटलं आहे."
इस्रोचं स्पाडेक्स मिशन
इस्रोनं 30 डिसेंबर रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून PSLV C60 रॉकेटच्या मदतीनं SDX01 (चेझर) आणि SDX02 (लक्ष्य) हे दोन उपग्रह प्रक्षेपित केले होते. प्रत्येकी सुमारे 220 किलो वजनाचे हे दोन छोटे उपग्रह 475 किमीच्या वर्तुळाकार कक्षेत इंजेक्ट करण्यात आले. इस्रोच्या मते, स्पाडेक्स मिशन हे या दोन लहान अवकाशयानांचा वापर करून अंतराळातील डॉकिंगचं तंत्रज्ञान विकसीत करण्याचं मिशन आहे. हे तंत्रज्ञान भारताच्या चंद्रावरील महत्त्वाकांक्षा, चंद्रावरून नमुना घेऊन परत पृथ्वीवर येणे, भारतीय अंतरिक्ष स्टेशन (BAS) ची उभारणी आणि ऑपरेशन इत्यादींसाठी आवश्यक आहे.
SPADEX महत्त्वाचा प्रकल्प
स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट (SPADEX) हा एक महत्त्वाचा प्रकल्प आहे, जो दोन लहान उपग्रहांचा वापर करून अंतराळयानात जोडला जाणार आहे. डॉकिंग आणि अनडॉकिंगसाठी आवश्यक तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी आणि प्रदर्शित करण्यासाठी डिझाइन केलेले हे दोन उपग्रह असल्याचं इस्त्रोनं संस्थेनं म्हटलं आहे.
पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञान
केंद्रीय राज्यमंत्री पुढं म्हणाले की, SpaDeX चे मिशन पंतप्रधान मोदींच्या "आत्मनिर्भर भारत" या संकल्पनेशी निगडीत आहे. पत्रकार परिषदेला संबोधित करताना सिंग म्हणाले, "SpaDeX मिशनचं प्रक्षेपण हा भारतानं आतापर्यंत हाती घेतलेल्या पहिल्या प्रयोगांपैकी एक आहे. डॉकिंग तंत्रज्ञान हे पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञान आहे आणि म्हणूनच त्याला भारतीय डॉकिंग तंत्रज्ञान असं नाव देण्यात आले आहे.
अनडॉकिंगसाठी आवश्यक तंत्रज्ञान
30 डिसेंबर रोजी, भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) नं SpaDeX आणि नाविन्यपूर्ण पेलोडसह PSLV-C60 लाँच करून ऐतिहासिक कामगिरी केली होती. SpaDeX मिशन हे PSLV नं प्रक्षेपित केलेल्या दोन लहान अंतराळयानांचा वापर करून इन-स्पेस डॉकिंगच्या प्रात्यक्षिकासाठी एक किफायतशीर तंत्रज्ञान मिशन आहे. SpaDeX मोहिमेचे प्राथमिक उद्दिष्ट लो-अर्थ वर्तुळाकार कक्षेत दोन लहान अंतराळयानांचं डॉकिंग आणि अनडॉकिंगसाठी आवश्यक तंत्रज्ञान विकसित करणं आहे. "स्पेडेक्स मिशन डॉकिंगमध्ये भारताच्या क्षमता वाढवण्यासाठी एक मैलाचा दगड ठरणार आहे, उपग्रह सेवा, अंतराळ स्थानक ऑपरेशन्स आणि आंतरग्रहीय मोहिमांसह भविष्यातील अंतराळ मोहिमांसाठी एक महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान यातून विकसीत करणार असल्याचं" इस्रोनं एका स्पष्टीकरणात म्हटलं आहे.
हे वाचलंत का :
- स्पेडेक्स यशस्वीरित्या प्रक्षेपित, इस्रोनं नवीन वर्षापूर्वीच अवकाशात रचला इतिहास
- श्रीहरिकोटा येथून स्पॅडेक्स मिशनचे यशस्वी प्रक्षेपण
- इस्रोचं स्पेडेक्स मिशन आज होणार लॉंच, काय आहे स्पेडेक्स मिशन?