नाशिक : किरकोळ वादातून काही महिला व पुरुषांनी तरुणाच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून, शस्त्राने वार केल्याची घटना उघडकीस आली आहे. नाशिकच्या आडगाव परिसरात असलेल्या अमृतधाम कामगारमध्ये काल (24 नोव्हेंबर) रात्री साडे दहाच्या सुमारास ही घटना घडली. विशांत भोये असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. याबाबत आडगाव पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतलं. मात्र, घडलेल्या या घटनेमुळं परिसरात खळबळ उडाली आहे.
तरुणाची केली हत्या : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत विशांत भोये हा आपल्या कुटुंबासमवेत पंचवटी अमृतधाम विडी कामगार नगर येथे राहत होता. दोन दिवसांपूर्वी त्याचा परिसरातील काही मुलांसोबत वाद झाला. काल रात्री साडेदहाच्या सुमारास कामगार नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्राजवळ विशांत आपल्या मित्रांसोबत गप्पा मारत उभा होता. त्यावेळी त्या ठिकाणी अचानक काही महिला आल्या आणि त्यांनी विशांत आणि त्याच्या मित्रांच्या डोळ्यात आधी मिरचीची पूड टाकली, त्यानंतर सात जणांच्या टोळक्यानं विशांतवर हल्ला केला. यातील एका संशयितानं विशांतवर वार केल्यानं तो रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळला. त्याच्या मित्रांनी त्याला तत्काळ रुग्णालयात नेलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.