अमरावती World Of Termites : पावसाळ्यात अनेकदा पथदिव्यांच्या प्रकाशाखाली शेकडो किडे बघायला मिळतात. फकडी, पावसाळी किडे, पतंग पाखर मुंग्या अशा नावानं त्यांना विविध भागात ओळखलं जातं. वास्तवात हे किडे म्हणजे उधळी अर्थात वाळवी आहे. पावसाळा आला की वाळवीला पंख फुटतात. तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, वाळवीला आयुष्यात एकदाच पंख फुटतात आणि त्यानंतर ती प्रकाशाच्या दिशेनं झेप घेते. पथदिव्यांशिवाय घरात देखील दिव्यांच्या उजेडात या किड्यांची झुंबड पाहायला मिळते. मात्र, तुम्हाला हे माहीत आहे का की या पावसाळी किड्याचं अर्थात वाळवीचं स्वतःच एक अनोखं विश्व आहे. राजा, राणी, सैन्य, मजूर यांच्यासह त्यांचा खास राजवाडा देखील असतो. उधळीच्या या विश्वासंदर्भात अमरावतीच्या श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य आणि कीटकशास्त्र विषयातील तज्ञ डॉ. समीर लांडे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना माहिती दिली.
जोडीदार शोधण्यासाठी उड्डाण : कामगार, सैन्य, प्रजनन करणारे आणि चौथे दुय्यम प्रजननक्षम अशा वाळवीच्या चार जाती असतात. ज्यावेळी प्रजनन करणाऱ्या वाळवी मरतात. त्यावेळी त्यांची जागा दुय्यम प्रजननक्षम वाळवी घेतात. प्रजननक्षम वाळवी जेव्हा प्रौढ होते, त्यावेळी त्यांना आयुष्यात एकदाच पंख फुटतात. त्यानंतर त्या आपल्या जोडीदाराचा शोध घेण्यासाठी घर सोडून प्रकाशाच्या दिशेनं उड्डाण घेतात. दिव्यांकडं झेप घेतल्यावर जेव्हा ते खाली पडतात त्यावेळी जमिनीवर नर आणि मादी आपला जोडीदार शोधतात. एक इंचाच्या या वाळवीला दोन इंच इतके पंख असतात. या पंखांमुळं त्यांना प्रजनन करणं कठीण जात असल्यामुळं त्या आपल्या शरीरापासून हे पंख वेगळे करतात आणि त्यानंतर नर-मादीचं मिलन होतं.
वाळवी देते दोन हजार अंडी : वाळवी ही एकाचवेळी दोन हजार अंडी देते. या अंड्यांमधून सुरुवातीला कामकरी वाळवी जन्म घेते. ही कामकरी वाळवी त्यांना जन्म देणाऱ्या राणीचं संगोपन करते. राणीला खाऊ घालणं, तिच्यासाठी अन्नाची व्यवस्था करणं, वारुळाची बांधणी करणं तसंच वारुळाचं रक्षण करणं आदी काम कामकरी वाळवी करतात.